प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जवळपास आठ कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली असून पुढील वर्षी २६ जानेवारीपर्यंत सदर योजनेत १० कोटी लोकांचा समावेश होईल अशी अपेक्षा आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१४ रोजी जनधन योजनेची घोषणा केली आणि २६ जानेवारी २०१५ पर्यंत ७.५ कोटी घरांत ती पोहोचविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. गेल्या एक-दोन दिवसांपूर्वी ७.९८ कोटी लोकांनी बँकेत खाती उघडली असून २६ जानेवारीपर्यंत १० कोटींचे उद्दिष्ट साध्य होईल, अशी अपेक्षा आहे, असे जेटली म्हणाले.
केवळ गावेच नव्हेत, तर प्रत्येक गावातील प्रत्येक घर हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी बँकेची शाखा नसल्यास तेथे किमान एटीएम सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशा विविध उपाययोजनांद्वारे आम्हाला देशात बँकसेवेचा विस्तार करावयाचा आहे, असेही ते म्हणाले. सदर योजनेचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी सरकार घेणार असून ही योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी आहे, असेही अर्थमंत्री म्हणाले.