कोलकाता/ नवी दिल्ली : विस्तारा एअरलाइन्सचे मुंबई- कोलकाता विमान उतरण्याच्या बेतात असतानाच खराब वातावरणाने विमान प्रभावित होऊन ८ प्रवासी जखमी झाले.यूके ७७५ हे विमान दुपारी ४.२५ वाजता कोलकाता विमानतळावर सुरक्षितरीत्या उतरले, असे विमानतळ संचालक सी. पट्टाभि यांनी सांगितले. ‘टब्र्युलन्स’मुळे विमानातील ३ प्रवासी गंभीर जखमी झाले, तर पाच प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या, अशीही माहिती त्यांनी दिली.

गंभीर जखमी प्रवाशांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले, तर किरकोळ जखमी प्रवाशांवर प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गंतव्य स्थळी रवाना करण्यात आले. विमानात १२३ प्रवासी होते.

हे विमान कोलकात्यापासून २५ नॉटिकल मैल अंतरावर असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास खराब वातावरणामुळे ही घटना घडली, असेही पट्टाभि म्हणाले.

प्रवाशांना आलेल्या दुर्दैवी अनुभवाबद्दल आम्ही दु:खी आहोत. या घटनेचा आम्ही प्राधान्याने तपास करत आहोत, असे विस्ताराच्या प्रवक्त्याने सांगितले.