येथील मिठाई दुकानदाराने जास्त वजनाचा लाडू तयार करण्याचा स्वत:चाच गिनीज विक्रम मोडण्याचे ठरवले आहे.चार वेळा या दुकानदाराने विक्रम केला असून या वेळी गणेश उत्सवात आठ हजार किलोचा लाडू तयार करून हा विक्रम मोडण्याचा त्याचा इरादा आहे.
श्री भक्तजनेय स्वीट्सचे मालक सलादी व्यंकटेश्वरा राव यांनी सांगितले की, लागोपाठ पाचव्या वर्षी ते लाडू तयार करीत असून यावेळी ८ हजार किलो वजनाचा लाडू तयार केला जाईल. दुसरा एक लाडू तयार केला जाणार असून तो ६४०० किलो वजनाचा असेल, त्याच्या ताटाचे वजन ८७५ किलो असून ते वेगळे असेल. आंध्र प्रदेशातील दोन गणेशमूर्तीना हे लाडू दिले जाणार आहेत.
आठ हजार किलोच्या लाडूला ‘नव्यांध्रा लाडू’ असे नाव दिले असून तो विशाखापट्टनम येथील विशाखा एकात्म समाजकल्याण मंडळाच्या ८० फुटी गणपतीपुढे ठेवला जाणार आहे. १२ कामगारांनी आठ तासात हा लाडू तयार केला आहे.
आम्ही आमचाच विक्रम मोडणार आहोत, तसेच ओडिशा, बंगळुरू, चेन्नई व हैदराबाद येथून लाडूची मागणी नोंदवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. ६४०० किलोचा लाडू विजयवाडा येथील दुंडी गणेश सेवा समितीच्या ६३ फुटी नाटय़ गणेशमूर्तीसाठी तयार केला आहे. हे दोन्ही लाडू बुधवारीच दिले जाणार आहेत. हे लाडू तयार करण्यात ४० कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
सुरूची स्वीट्स दुकान ५९९५ किलोचा लाडू तयार करीत असून तो तेलंगणातील खैरताबाद येथील त्रिशतीमाया मोक्ष गणपती मंडळाला दिला जाणार आहे. पी. मल्लिकार्जुन राव हे या दुकानाचे मालक असून त्यांनी गेल्यावेळी ४०० किलोचा लाडू बनवला होता. थर्मल हिटिंग सिस्टीमचा वापर करून त्यांनी लाडू तयार केला आहे.
लाडूचे गिनीज विक्रम
ंश्री भक्तजनेय स्वीट्स
५५७० किलो (२०११)
६५९९ किलो (२०१२)
७१३२ किलो (२०१३)
७८५८ किलो(२०१४)

लाडूचे घटक

साखर
डाळीचे पीठ
गाईचे तूप
काजू
शेंगदाणे
वेलची
खाण्याचा पिवळा कापूर
हळद
सुकामेवा