शाळेतला गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून ८ वर्षांच्या एका मुलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. गुजरातच्या सुरत या शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रद्युमन असे या मुलाचे नाव आहे. प्रद्युमन हा लिटील स्टार इंग्लिश हायस्कूलचा विद्यार्थी असून चौथीत शिकतो. इंग्रजी विषयाचा अभ्यास का केला नाहीस? असा प्रश्न विचारत प्रद्युमनला त्याच्या शिक्षकेने छडीने मारहाण केली. या मारहाणीचे वळ त्याच्या हाता-पायावर आणि पाठीवर उमटले आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने ही बातमी दिली असून या संदर्भातले ट्विट्सही केले आहेत.

प्रद्युमनला इंग्रजी शिकवणाऱ्या मॅडमचे नाव नैना असे आहे. त्या प्रद्युमनला मारत असतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. शिक्षिकेने केलेल्या मारहाणीमुळे प्रद्युमनच्या पाठीला गंभीर जखमा झाल्या आहेत. प्रद्युमनच्या आई वडिलांनी शिक्षिका नैना यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी ही मारहाणीची घटना घडली त्यानंतर बुधवारी शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे असेही ‘एएनआय’ने म्हटले आहे.