दिमापूर येथील बलात्काराच्या आरोपीला तुरूंगातून बाहेर काढून त्याला बेदम मारहाण करत भरचौकात फाशी दिल्याप्रकरणी पोलिसांनी १८ जणांना अटक केली आहे.  सय्यद फरीद खान याला जमावाकडून मारण्यात आल्यानंतर सदर घटनेबद्दल मिळालेल्या एका मोबाइल व्हिडिओच्याआधारे १८ जणांना अटक केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच, जमावाला तुरूंगात जावू देण्यासाठी मदत केल्याप्रकरणी पोलिसांवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे. दिमापूरमधल्या घटनेचा करीमगंजसह आसाममध्ये विविध ठिकाणी निषेध केला जात आहे. जमावाकून फाशी देण्यात आल्यानंतर सय्यद फरीद खान याचे मृत शरिर त्याच्या करीमगंज येथील जन्मगावी काल नेण्यात आले.
सय्यदने २३ फेब्रुवारी रोजी नागा समुदायाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. त्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, नागा समुदायातील लोकांमध्ये या घटनेवरून असंतोष खदखदत होता. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी हजारो लोकांचा जमाव कारागृहावर चालून गेला आणि जमावाने सय्यदला खेचतच कारागृहाबाहेर आणले. त्यानंतर त्याची शहरभर फरफटत धिंड काढून वाटेतच त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत सय्यद मरण पावला आणि त्यानंतर जमावाने त्याला भररस्त्यात फासावर लटकविले होते.