महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू व पश्चिम बंगाल यांसह दहा राज्यांत करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असून नवीन रुग्णांपैकी ७९.१० टक्के या राज्यांतील आहेत. भारतात नवीन २ लाख १७ हजार ३५३ रुग्ण सापडले असून त्यांची नोंद २४ तासांतली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक ६१,६९५ तर उत्तर प्रदेशात २२,३३९, दिल्लीत १६,६९९ रुग्ण सापडले आहेत.

भारतात एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ७९ हजार ७४३ झाली असून ती एकूण रुग्णांच्या १०.९८ टक्के आहे. एकूण गेल्या २४ तासांत ९७,८६६ इतकी वाढ झाली आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांत एकूण उपचाराधीन रुग्णांच्या  ६५.८६ टक्के रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात एकूण उपचाराधीन रुग्णांच्या ३९.६० टक्के रुग्ण असून महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगण, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे.

भारताची एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ कोटी २५ लाख ४७ हजार ८६६ आहे तर २४ तासांत १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण बरे झाले आहेत तर ११८५ बळी गेले आहेत. दहा राज्यांत ८५.४० टक्के नवीन बळी गेले असून महाराष्ट्रात ३४९ तर छत्तीसगडमध्ये १३५ बळी गेले. एकूण ११ कोटी ७२ लाख २३ हजार ५०९ जणांचे लसीकरण १७ लाख ३७ हजार ५३९ सत्रांत करण्यात आले.

आरोग्य कर्मचाऱ्यांत ९० लाख ८२ हजार ९९९ जणांना पहिली तर ५६ लाख ३४ हजार ६३४ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत १ कोटी २ लाख ९३ हजार ५२४ जणांना पहिली तर ५१ लाख ५२ हजार ८९१ लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली. साठ वर्षावरील ४ कोटी ४२ लाख ३० हजार ८४२ जणांना पहिली तर ३० लाख ९७ हजार ९६१ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली.

४५ ते ६० वयोगटातील ३ कोटी ८७ लाख ४१ हजार ८९० जणांना पहिली तर ९८७७६ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ या राज्यांत ५९.६३ टक्के लसीकरण झाले आहे. २४ तासांत २७ लाख जणांना लस देण्यात आली. नव्वदाव्या दिवशी १५ एप्रिल रोजी २७ लाख ३० हजार ३५९ जणांना लस देण्यात आली.