हैदराबादमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी) शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कमी गुण मिळाल्याने तसेच नोकरी न मिळाल्याने आत्महत्या करत असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. तसेच आयुष्य एकदाच मिळते ते आयटी श्रेत्रात फुकट घालवू नका असा सल्लाही त्याने या चिठ्ठीमधून जवळच्या मित्रांना दिला आहे.

मार्क अॅण्ड्रू चार्ल्स असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मार्कने आत्महत्येपूर्वी आठ पानांची चिठ्ठी लिहिली आहे. ‘मला सध्या नोकरी नाहीय आणि ती मिळण्याचीही शक्यता नाहीय. कमी मार्क असलेल्या कोणी नोकरी देत नाही. माझ्या निकालाकडे पाहणे वेगळाच अनुभव आहे. आणखीन एक दोन अक्षर आणि तो निकालाचा कागद म्हणजे इंग्रजीतली बाराखडीच वाटेल,’ असं मार्कने आपल्या निकालाबद्दल या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये कमी गुण मिळाल्याने मार्क तणावाखाली होता हे त्याच्या चिठ्ठीवरुन दिसत आहे. हैदराबाद आयआयटीमध्ये मागील सहा महिन्यात विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची ही दुसरी वेळ आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनिरुद्ध मुम्मनैनी याने सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.

मार्क हा आयआयटीमध्ये मास्टर्स इन डिझायनिंगच्या अभ्यासक्रमाला होता. नुकतीच त्याने दुसऱ्या वर्षाची परिक्षा तो नुकतीच उत्तीर्ण झाला होता. पाच जुलै रोजी त्याचे तिसऱ्या वर्षातील शेवटचे प्रेझंटेशन होते. मार्कने लिहिलेल्या चिठ्ठीमधून त्याने नोकरी न मिळणे, कमी गुणांमुळे आलेले नैराश्य याचा उल्लेख केला असल्याचे ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.

‘इतरांप्रमाणे माझीही काही स्वप्नं होती. मात्र आता ती सर्व संपली आहेत. नेहमी हे आनंदी राहणं, चेहऱ्यावर खोटं हसू ठेवणं, काहीच ठीक नसताना लोकांना सर्व ठिक असल्याचं सांगणं याचा मला कंटाळा आला आहे,’ असं मार्कने आत्महत्येपूर्वी आपल्या पालकांना आणि मित्रांना लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे. मुळचा वाराणसीचा असणाऱ्या मार्कने आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये तुमच्या अपेक्षा मला पुर्ण करता आल्या नाहीत म्हणून मी तुमची माफी मागतो असंही म्हटलं आहे. ‘घरापासून दोन वर्ष लांब सर्वोत्तम शिक्षण संस्थेत सर्वोत्तम लोकांबरोबर राहून मी काहीच केलं नाही. मी हे सर्व वाया घालवले आहे,’ असं मार्कने आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच माझ्या शरीरावर अंत्यसंस्कार करु नये अशी विनंतीही त्यांनी आपल्या पालकांकडे केली आहे. ‘माझे शरीर दफन करु नका. त्याऐवजी ते एखाद्या वैद्यकीय संस्थेला दान करा. भारताच्या भावी डॉक्टरांना अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल,’ असं मार्कने म्हटलं आहे.

आत्महत्येच्या चिठ्ठीमध्ये मार्कने त्याच्या मित्रांचीही माफी मागितली आहे. मागील दोन महिने हे आयुष्यातील सर्वात सुंदर महिने होते त्यासाठी सर्व मित्रांचे आभार त्याने या चिठ्ठीमध्ये मानले आहेत. या चिठ्ठीमधून त्याने आपल्या जवळच्या मित्रांना आयटी क्षेत्रात आयुष्य न घालवण्याचा सल्ला दिला आहे. ‘अनिकेत राजो, आयटीमध्ये काम करता करता स्वत:च्या आयुष्य विसरु नकोस. रोज थोडं जगत जा मित्रा. एकच आयुष्य मिळालं आहे,’ असा सल्ला मार्कने या चिठ्ठीमधून आपल्या मित्रांना दिला आहे.