जगभरातील पावसाच्या आकृतिबंधांवर परिणाम करणाऱ्या ‘अल-निनो’चे या वर्षी आगमन झाले असले तरी यंदा त्याची तीव्रता जास्त नसल्याने भारतातील मान्सूनवर त्याचा विशेष परिणाम होणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे.
या वर्षी ‘अल-निनो’चे ५ मार्चला अधिकृत आगमन झाल्याची माहिती अमेरिकेच्या हवामान खात्याने दिली असून त्याच्या शास्त्रीय निरीक्षणास सुरुवात झाली आहे. यंदा त्याचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले आहे आणि त्याची तीव्रताही नेहमीसारखी नसेल असा अंदाज आहे. भारतीय उपखंडातील हवामानाच्या दृष्टीने ही बाब हितकारक समजली जाते. त्यामुळे देशातील मान्सूनावर फारसा परिणाम न होता पावसाचे प्रमाण सरासरीच्या जवळपास राहील.
प्रशांत महासागराचे तापमान वाढल्याने सामान्यपणे दक्षिण अमेरिकेकडून आशियाकच्या दिशेने वाहणारे वारे मंदावतात. त्याचा भारतातील मोसमी पावसावर परिणाम होतो. अशा वेळी भारतीय उपखंडात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आढळते. प्रशांत महासागर जर सामान्यपेक्षा फार उष्ण किंवा थंड झाला नाही तर त्याचा भारतातील पर्जन्यमान घटून दुष्काळ पडण्याची केवळ १६ टक्के शक्यता असते.
गेल्या १४० वर्षांत निम्म्याहून अधिक वेळा भारतातील प्रमुख दुष्काळांची वेळ ‘अल-निनो’च्या ‘सदर्न ऑसिलेशन्स’शी जुळून आली आहे. सन २००० नंतर २००२, २००४, २००६ आणि २००९ या वर्षी ‘अल-निनो’ आढळून आला आणि त्यापैकी तीन वेळा  (२००६ वगळता) भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडून दुष्काळसदृश परिस्थिती होती.
यंदा मात्र ‘अल-निनो’ अवेळी उद्भवला आहे आणि त्यामुळे त्याची तीव्रता फारशी असणार नाही. म्हणजेच भारतातील पावसावर विशेष परिणाम होणार नाही.   या संदर्भात भारतीय हवामान विभागाने अद्याप अधिकृत माहिती प्रसृत केलेली नाही. मात्र हवामानतज्ज्ञ (लाँग रेंज फोरकास्टिंग डिव्हिजनचे अध्यक्ष) डॉ. डी. शिवानंद पै यांनी सांगितले की, इतक्यात या विषयावर काही ठामपणे सांगता येणार नाही. आम्ही भारतातील मान्सूनबाबत एप्रिलच्या मध्यात पहिला अंदाज व्यक्त करू. सध्या ‘अल-निनो’ फारसा सक्रिय नसल्याने तापमान आणि पर्जन्यमानही सामान्य राहील, असे वाटते. त्यामुळे यंदा भारतात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  
काय आहे ‘अल-निनो’?
अल-निनो ही ठरावीक वर्षांनी होणारी हवामानविषयक घडामोड आहे. त्या दरम्यान प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान प्रदीर्घ काळासाठी आणि सामान्यपेक्षा अधिक वाढते. हा परिणाम नऊ महिने ते दोन वर्षांपर्यंत टिकतो.
अल-निनोमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेकडील किनाऱ्याजवळ प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय पट्टय़ात हवामान सामान्यपेक्षा वाढते किंवा कमी होते आणि त्याने मोसमी वाऱ्यांचा जोर मंदावतो. त्याला ‘सदर्न ऑसिलेशन्स’ म्हणतात. तापमान जर सामान्यपेक्षा कमी झाले तर त्याला ‘ला-निनो परिणाम’ म्हणतात.