सध्या प्रशांत महासागरातील एल निनो प्रवाहांमुळे केवळ भारतातील मान्सूनलाच फटका  बसला आहे अशातला भाग नाही तर अमेरिकेत कॅलिफोर्नियातही त्याचा फटका बसला आहे विशेष म्हणजे यावेळचा एल निनो परिणाम हा सर्वात जास्त प्रभावी असून, गेल्या ६५ वर्षांत एल निनोचा इतका गंभीर परिणाम जगाच्या हवामानावर झाला नव्हता असे अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांचे मत आहे. एल निनोमुळे जगात काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी भरपूर पाऊस असा विरोधाभास निर्माण होतो. पण अजूनही चार वर्षे दुष्काळ झेलणारा कॅलिफोर्निया पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
द नॅशनल ओशनिक अ‍ॅटमोस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन या संस्थेने म्हटले आहे की, प्रशांत महासागरातील जलप्रवाह तीन महिन्यात उष्ण बनले आहेत व नेहमीपेक्षा एल निनोचे स्वरूप जास्त तीव्र आहे. एल निनो परिणामात विषुववृत्तीय प्रशांत महासागरात जलप्रवाहांची उष्णता वाढते. या संस्थेचे माईक बालपेर्ट यांनी सांगितले की, सध्याचा एल निनो हा १९९७-९८, १९८२-८३ व १९७२-७३ या वर्षांपेक्षा तीव्र आहे. एलनिनोचा परिणाम अमेरिकेतील हिवाळ्यावर व भारतातील मान्सूनवर होत असतो. एल निनोमुळे कॅलिफोर्नियात हिवाळ्यात पाऊस होतो. पण यावेळी कॅलिफोर्नियात पाऊस झालेला नाही तसेच भारतातील मान्सूनवर त्याचा विपरित परिणाम होतो त्याप्रमाणे यंदा भारतात पाऊस झालेला नाही. खरेतर एल निनोमुळे कॅलिफोर्नियात अवक्षेप तयार होऊन पाऊस पडतो  पण भारत व ऑस्ट्रेलियात दुष्काळ पडतो. प्रशांत महासागरात वादळे होतात. एकूणच सगळीकडे तापमान वाढते. पूर्व अमेरिकेत गेल्यावर्षी अनेक राज्यात तापमान सरासरीपेक्षा कमी होते, पण जागतिक पातळीवर २०१४ हे १८८० पासूनचे सर्वात उष्ण वर्ष होते. कॅलिफोर्निया हवामान ब्लॉग लिहिणारे संशोधक डॅनियल स्वेन यांनी म्हटले आहे की, उत्तर पॅसिफिकमध्ये एल निनो नेहमीपेक्षा तीव्र आहे. त्यामुळे तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अर्धगोलार्धाच एल निनो यावर्षी हिवाळ्यात कायम राहण्याची ९० टक्के शक्यता हवामान अंदाजकर्त्यांनी वर्तवली आहे. त्याचा परिणाम नंतरही राहणार आहे. यंदाचा एल निनो हा १९९७-९८ इतक्या तीव्रतेचा आहे. कॅलिफोर्नियात एल निनोने अवक्षेप तयार होऊन पाऊस पडतो, लागोपाठ चार वर्षे कॅलिफोर्नियात दुष्काळ आहे. विल्यम पॅटझर्ट यांच्या मते यावेळी एलनिनोचा परिणाम ९७-९८ प्रमाणेच घडून येईल असे नाही. कारण आताच्या परिस्थितीत १९९७ मध्ये असलेला एक घटक नाही तो म्हणजे व्यापारी वाऱ्यांचे मध्य व पश्चिम पॅसिफिकच्या दिशेने वाहणे. त्यामुळे हवामानातील बदल पूर्वेकडे सरकत असतो पण यावेळी तसे घडले किंवा घडणारही नाही. एल निनोचा परिणाम प्रत्यक्ष वारे कसे वाहतात यावर अवलंबून असतो. त्यानुसार पश्चिमेकडे एल निनो निराशा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. १९८२ मध्ये कॅलिफमध्ये सांताक्रूझची सॅन लोरेन्झो नदी दुथडी भरून वाहत होती. कारण त्यावेळी प्रशांत महासागरावरील व्यापारी वारे कॅलिफोर्नियाच्या दिशेने गेले होते. एल निनोमुळे कॅलिफोर्नियात पाऊस होतो हे खरे असले तरी यावेळी तो कॅलिफोर्नियाचा दुष्काळ हटवेल अशी खात्री नाही. मध्य व उत्तर कॅलिफोर्नियातून राज्यात पाणीपुरवठा होतो पण दक्षिण कॅलिफोर्नियात फारसा पाऊस पडत नाही असे वेस्टर्न रिजनल क्लायमेट सव्‍‌र्हिसेसचे केविन वेर्नर यांचे म्हणणे आहे. कॅलिफोर्नियातील गेल्या वर्षांच्या दुष्काळाची हानी भरून काढण्यासाठी किंवा जलतूट भरून काढण्यासाठी नेहमीच्या दुप्पट अवक्षेप तयार होणे गरजेचे
आहे.
कदाचित एल निनो यावेळी पाऊस आणेल पण हिमवर्षांव आणू शकणार नाही असे स्वेन यांचे मत आहे. एल निनोचे परिणाम सतत बदलत असतात त्यात अमुक एक असेच घडेल अशी खात्री कुणी देऊ शकत नाही, असे कॅलिफोर्नियाचे हवामान वैज्ञानिक मायकेल अँडरसन यांनी सांगितले.

एल निनोचे परिणाम
* एल निनोमुळे ऑस्ट्रेलिया व भारतात दुष्काळ पडतो
* अमेरिकेतील कॅलिफोर्नियात चांगला पाऊस होतो
* यंदा सर्वात प्रखर एल निनो असल्याने भारतात दुष्काळ तर आहे पण कॅलिफोर्नियात पावसाची अनिश्चितता आहे.