एल निनो परिणामामुळे जगभरात अनेक ठिकाणी तापमान वाढून दुष्काळ पडला. अन्नपाण्याची टंचाई निर्माण झाली. आशियातील शेतीला मोठा फटका बसला हे खरे असले तरी आता त्याचे भावंड असलेल्या ला निना परिणामामुळे ठिकठिकाणी पूर येण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
गेल्या वर्षी एल निनो परिणामाला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांतील हा सर्वात प्रखर एल निनो होता. त्यामुळे अनेक दशकांत प्रथमच मेकाँग नदी कोरडी पडली. फिलिपीन्समध्ये अन्नाशी निगडित संघर्ष झाले. अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसपेक्षा अधिक होते. आग्नेय आशियात १० अब्ज डॉलर्सची हानी झाली असे आयएचएस ग्लोबल इनसाइटने म्हटले आहे. आता हा एल निनो परिणाम या वर्षीच्या मध्यावधीत कमी होईल व ला निना हा तेवढाच प्रखर पण विरोधी गुण दाखवणारा परिणाम वाढीस लागेल. ला निना परिणामामुळे आधीच्या पूरप्रवण भागात आणखी पाऊस पडेल, त्यामुळे कृषी उत्पादनांचे पुरामुळे नुकसान होईल.
संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी मदत विभागाचे उपसचिव स्टीफन ओब्रायन यांनी सांगितले, की ला निनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल. एल निनोमुळे आधीच सहा कोटी लोकांना फटका बसला असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. आशिया व आफ्रिकेत हा फटका जास्त बसला आहे. ग्रीन पीसचे कृषी प्रचारक विलहेमिया पेलेग्रिना यांनी सांगितले, की ला निना आशियात आणखी हानिकारक ठरेल, कारण त्यामुळे पूर येतील व दरडी कोसळतील. पिकांची हानी होऊन अन्न उत्पादन कमी होईल. एल निनो हा प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्याने निर्माण होणारा विशिष्ट कालावधीतील परिणाम आहे, त्यामुळे काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पूर येतात. आशियात यंदा भाजून काढणारे तापमान होते, त्यामुळे अनेकांची उपजीविका धोक्यात आली. व्हिएतनाम हा तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्याला शतकातील सर्वात मोठय़ा दुष्काळाचा फटका बसला आहे.
मेकाँग त्रिभुज प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर तांदळाचे उत्पादन होते, पण तेथे नद्यांना पाणीच नसल्याने पन्नास टक्के जमीन उजाड झाली तेथे खारे पाणी गेले त्यामुळे पिकांची हानी झाली, असे कान थो विद्यापीठाचे हवामान बदल प्राध्यापक ले अन तुआन यांनी सांगितले. भारतात ३३० दशलक्ष लोकांना पाणीटंचाईचा फटका बसला असून, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वाढत्या तापमानामुळे माणसांना उष्माघात झाला तर जनावरांचे बळी गेले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2016 1:36 am