निवडणूक आयोगाने बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसह विविध राज्यांमधील विधानसभेच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, नागालॅण्ड, ओदिशा, तेलंगणा व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

तर, आसाम, केरळ, तामिळनाडू व पश्चिम बंगालच्या सात जागांसाठी पोटनिवडणूक न घेण्याचे आयोगाने या राज्यांकडून आलेल्या माहितीवरून ठरवले आहे. अन्य राज्यांमधील विधानसभेच्या जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी तर मणिपूरच्या जागेसाठी व बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी असणार आहे.

सर्वाधिक २७ जागा मध्य प्रदेश विधानसभेच्या आहेत ज्या ठिकाणी पोट निवडणूक होत आहे. तर गुजरातमधील ८ जागांसाठी मतदान होणार असून, उत्तर प्रदेशच्या सात जागा व झारखंड, मणिपूर, नागालॅण्ड, ओदिशा आणि कर्नाटकच्या प्रत्येकी दोन व तेलंगणा आणि छत्तीसगडच्या एका जागेसाठी मतदान होणार आहे. बिहारमधील लोकसभेच्या एका जागेसाठी निवडणुक घेतली जात आहे.