भारतात अद्यापही विविध जातींमध्ये खाप पंचायतींमार्फत स्वतःचे कायदे-कानून चालवले जातात. विशेष म्हणजे यातील पंच मंडळीच सर्वाधिक भ्रष्ट असल्याचे अनेकदा समोर आलं आहे, त्यांचे निवाडे हे माणसाची सद्सदविवेकबुद्धी गहाण ठेवणारे असतात. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. राजस्थानातील चित्तोडगड येथे एका खाप पंचायतीने बालविवाहाला विरोध करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीला १२ वर्षांसाठी जातीतून बहिष्कृत केलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवलाल (वय ६५) असं पीडित ज्येष्ठ व्यक्तीचं नाव असून त्यानं ‘बालविवाह’ आणि ‘मृत्यूभोज’ या पारंपारिक प्रथांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर १२ वर्षांसाठी बहिष्कार घालण्याचे आदेश खाप पंचायतीतील पंचांनी गावकऱ्यांना दिले होते. २० सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन रविवारी ११ पंचायत सदस्यांना पोलिसांनी ताब्यातं घेतलं.

‘मौसर’ आणि ‘मृत्यूभोज’ला केला होता विरोध

याच वर्षी लॉकडाउनदरम्यान जुलै महिन्यांत सातखंडा गावात खाप पंचायत बोलावण्यात आली होती तसेच यामध्ये ग्रामस्थांना बालविवाह आणि मृत्यूभोज चालू ठेवण्याबाबत मतं मागवण्यात आली होती. यावेळी ६५ वर्षीय व्यक्ती शिवलाल यांनी विरोध दर्शवला होता.

‘हुक्का पाणी बंद’ खाप पंचायतीनं दिले आदेश

जर शिवलाल यांनी समाजातील प्रथांना विरोध केला तर त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा पंचायतीतील वरिष्ठ सदस्यांनी दिला होता. त्यानुसार, ३० सप्टेंबर रोजी त्यांनी शिवलाल यांच्या कुटुंबाचे ‘हुक्का पाणी बंद’चे गावकऱ्यांना आदेश दिले होते. यावर खाप पंचायत थांबली नाही तर जो शिवलाल यांच्या कुटुंबीयांशी व्यवहार ठेवेल त्याला १.१ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचा इशाराही दिला. या प्रकारानंतर पीडित शिवलाल यांनी ३ ऑक्टोबर रोजी पोलिसांत धाव घेत खाप पंचायतीतील १८ जणांविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई करत ११ जणांना अटक केली आहे.