पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये ४० हून अधिक जवान शहिद झाले. आठवडाभरापूर्वी झालेल्या या हल्ल्यानंतर अनेक स्तरामधून या शहीदांच्या कुटुंबाना मदत करण्यासाठी लोक पुढे येताना दिसत आहे. खेळाडू, अभिनेते, राजकारणी, सामान्य जनता अशा सर्वांनी आपआपल्या पद्धतीने पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुबियांना मदत करत आहेत. याच मदत करणाऱ्यांच्या यादीमध्ये एका भीक मागणाऱ्या महिलेचाही समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या महिलेने चक्क ६ लाख ६१ हजार ६०० रुपये पुलवामा शहीदांच्या कुटुंबियांना मदत म्हणून दिले आहेत.

राजस्थानमधील अजमेरमधील मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या नंदिनी शर्मा असं या महिलेचं नाव आहे. नंंदिनी यांचा सहा महिन्यापूर्वी मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वी त्यांनी आयुष्यभर भीक मागून जमवलेल्या रक्कमेतून उरलेली रक्कम मंदिराच्या विश्वस्तांच्या ताब्यात दिली. ही रक्कम एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करा हीच माझी शेवटी इच्छ असल्याचं नंदिनी यांनी सांगितले होते.

अजमेरमधील बजरंगनगर भागातील अंबे माता मंदिराबाहेर नंदिनी भीक मागायच्या. मात्र भीक मागून मिळवलेल्या पैश्यातून पोटापाण्याची सोय झाल्यानंतर त्या उरलेले पैसे एका बँक खात्यामध्ये दर महिन्याला जमा करायच्या. या खात्याचे वारसदार म्हणून त्यांनी मंदिरातील दोन विश्वस्थांची नावे दिली होती. ऑगस्ट महिन्यामध्ये नंदिनी यांचे निधन झाले. मात्र त्यांनी निधनापूर्वी आपल्या बँक खात्यातील रक्कम ही देशउपयोगी कामासाठी किंवा समाजासाठी वापरावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसारच त्यांच्या वारसदारांनी नंदिनी यांच्या खात्यावरील ६ लाख ६१ हजार ६०० रुपयांची रक्कम अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्याकडे दिली आहे. आता ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मदतनिधीमध्ये जमा करुन पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

नंदिनी शर्मा

 

‘जरी ही रक्कम नंदिनी यांनी भीक मागून कमवली असली तरी ती त्यांच्या मृत्यूनंतर देशसेवेसाठी किंवा समाजकार्यासाठी वापरली जावी अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच आम्ही ती पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियाना देण्याचा निर्णय घेतला’, असं नंदिनी वारसदार म्हणून नेमणूक केलेल्या संदीप गौर यांनी सांगितले.

नंदिनी यांच्या खात्यातील रक्कम पुलवामा येथील शहिदांना दान केल्याची बातमी अजमेर शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नंदिनी यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी भाविकांनी मंदिरामध्ये विशेष पुजेचे आयोजनही केले होते.