बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी होणार असून ३२ मतदारसंघातील ४५६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. सदर मतदारसंघ नक्षलग्रस्त जिल्ह्य़ातील असल्याने सुरक्षेचेही मोठे आव्हान आहे.

कैमूर, रोहतास, अरवाल, जेहानाबाद, औरंगाबाद आणि गया या जिल्ह्य़ांमधील हे ३२ मतदारसंघ आहेत. पहिल्या टप्प्यातील ४९ मतदारसंघांमधील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर एनडीएने महाआघाडीवर जोरदार हल्ला चढविला. नितीशकुमार मंत्रिमंडळातील एक मंत्री लाच स्वीकारत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाल्याने एनडीएला चांगलेच खाद्य मिळाले आहे.
सदर जिल्हे नक्षलग्रस्त असल्याने सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर आव्हान आहे. त्यामुळे २३ मतदारसंघात मतदानाची वेळ एक ते दोन तासांनी कमी करण्यात आली आहे. केवळ नऊ मतदारसंघातच सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकूण ८६ लाख १३ हजार ८७० मतदार ४५६ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.