News Flash

पाकव्याप्त काश्मीरमधील उमेदवारांमुळे निवडणूक रद्द

जम्मू-काश्मीर निवडणूक आयोगाचा निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीतील (डीडीसी) दोन जागांची निवडणूक रद्दबातल ठरविली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात झालेली ही निवडणूक पाकव्याप्त काश्मीरमधील दोन महिलांनी लढविली होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या महिलांनी काश्मीर खोऱ्यातील स्थानिकांशी विवाह केला होता.

जम्मू-काश्मीर पंचायत राज कायदा १९८९मधील अनुच्छेद ३६ अन्वये  निवडणूक आयोगाने आपल्या अधिकारांचा वापर करून द्रुगमुल्ला आणि हाजिन (ए) मतदारसंघातील निवडणूक रद्दबातल ठरविली, त्याचप्रमाणे सुमिया सदाफ आणि शाझिया अस्लम यांची उमेदवारी रद्द केली. आयोगाने येथे फेरमतदानाचे आणि उमेदवारांची यादी पुन्हा तयार करण्याचे आदेश दिले असून त्यामधून सदाफ आणि अस्लम यांची नावे वगळण्यासही सांगण्यात आले आहे.

सदाफ आणि अस्लम या दोघी पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादच्या रहिवासी असून त्यांनी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आहे त्यामुळे त्या भारताच्या नागरिक नाहीत, असे त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तक्रारीनंतर आयोगाने या दोन मतदारसंघातील मतमोजणी थांबविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:01 am

Web Title: election canceled due to candidates in pakistan occupied kashmir abn 97
Next Stories
1 प. बंगालमध्ये भाजपची ५७ उमेदवारांची पहिली यादी
2 महाराष्ट्रात केंद्रीय पथके
3 ‘बदनामीकारक’ बातम्या रोखण्यासाठी कर्नाटकातील सहा मंत्री न्यायालयात
Just Now!
X