News Flash

बँकांमधील शाईची निवडणुकांत बाधा नको

निवडणूक आयोगाची अर्थमंत्रालयाला सावधगिरीची सूचना

निवडणूक आयोगाची अर्थमंत्रालयाला सावधगिरीची सूचना

पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये येणाऱ्यांना शाई लावण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना शनिवारी (दि. १९) होत असलेल्या पोटनिवडणुकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ न देण्याची काळजी घेण्याची सूचना निवडणूक आयोगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाला केली आहे. कोणत्याही स्थितीत निवडणूक प्रक्रियेत बाधा येता कामा नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

आज (शनिवार) पश्चिम बंगालसह आसाम, मध्य प्रदेश, तमिळनाडू, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि पुदुच्चेरीमध्ये पोटनिवडणुकांसाठी मतदान होत आहे. तसेच पंजाबमध्ये साधारणत: फेब्रुवारीमध्ये, तर उत्तर प्रदेशामध्ये एप्रिलच्या आसपास निवडणूक अपेक्षित आहे. मतदानाप्रसंगी लावली जाणारी शाई बँकांमध्ये रक्कम काढणाऱ्यांनाही लावली जाणार असल्याने मतदान केल्याबाबत संभ्रम निर्माण होण्याची भीती पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. के. गुप्ता यांनी व्यक्त केली होती. त्याची त्वरित दखल घेऊन आयोगाने अर्थमंत्रालयाला सावधगिरीची सूचना केली.

१९६१च्या निवडणूक नियमावलीतील ४९ (क) कलमान्वये, मतदानप्रसंगी डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावली जाते. मधले बोट नसेल तर डाव्या हाताच्या कोणत्याही बोटाला ती लावतात आणि जर डावा हातच नसेल तर उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाला शाई लावली जाते. त्यामुळे डावा हात नसणाऱ्या मतदारांबाबत कदाचित संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आयोगाने गृहीत धरली आहे.

गोंधळाची शक्यता नाहीच; सरकारचा दावा

आयोगाला वाटणारी मतदानादरम्यान गोंधळाची भीती सरकारी सूत्रांनी नाकारली. ‘एक तर शाई लावण्याचा निर्णय सरसकट देशभरासाठी नाही. काही निवडक शहरांमध्ये आता कुठे त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे. त्यामुळे शनिवारी पोटनिवडणुका असलेल्या ठिकाणी ही अडचण येणार नाही. तसेच पंजाब निवडणुकीला अद्याप बराच काळ आहे. दुसरी बाब म्हणजे, बँकांमध्ये उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावली जात आहे. त्यामुळे गोंधळाची शक्यता खूपच कमी आहे,’ असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 1:02 am

Web Title: election commission comment on election ink
Next Stories
1 खाते तेथेच आज नोटाबदल
2 ..तर देशात दंगली होतील!
3 टोलमुक्तीने हजार कोटींचे ओझे
Just Now!
X