फेब्रुवारीमध्ये पाच राज्यांमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या पाच राज्यांमध्ये लागलेल्या पोस्टर आणि बॅनरवरील नेत्यांचे छायाचित्र हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमधील राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिले. यानुसार ज्या पोस्टर, बॅनर किंवा जाहिरातीमधून राजकीय नेता किंवा पक्षाने केलेल्या कामाची माहिती देण्यात आल्याचे दिसेल तेथील नेत्याचे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह हटवण्यात यावे असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

गोव्यातील राज्य निवडणूक आयुक्तांनी बॅनर आणि पोस्टरवरील नेत्यांच्या फोटोंकडे लक्ष वेधले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची दखल घेत निवडणूक होणा-या पाचही राज्यांसाठी नवीन निर्देश जारी केले. नवीन आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करावी, त्यामुळे आयोगाच्या निर्देशांचे योग्य पद्धतीने पालन होऊ शकेल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे. मात्र समाज कल्याण योजना तसेच कुटुंब नियोजनाच्या जाहिराती हटवू नये असे आयोगाने स्पष्ट केले आहे. ‘कोणताही राजकीय पक्ष सार्वजनिक स्थळ आणि पैशांचा वापर करुन स्वतःची जाहिरात करण्यासाठी करु शकत नाही असे आयोगाने म्हटले आहे.

कोणत्या राज्यात निवडणूक ?
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा- ११ फेब्रुवारी, दुसरा टप्पा- १५ फेब्रुवारी, तिसरा टप्पा- १९ फेब्रुवारी, चौथा टप्पा- २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा- २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा-४ मार्च तर सातव्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल. पंजाब व गोवा राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी, उत्तराखंड राज्यातही एकाच टप्प्यात १५ फेब्रुवारीस मतदान होईल. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ४ मार्च तर दुसऱ्या टप्प्यात ८ मार्च रोजी मतदान होईल.