News Flash

“राजकीय नेते कर्तव्य पार पाडण्यात कमी पडले,” मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाची याचिका

करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार धरल्यानंतर निवडणूक आयोग मद्रास हायकोर्टात

धाव घेतली आहे. पाचही राज्यांमध्ये प्रचारसभांदरम्यान करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन होत असतानाही राजकीय पक्षांना न रोखल्याने मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी जाहीर केली होती. आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करायला हवा, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले होते. यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचं सांगत न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

निवडणूक आयोगाने आपल्या याचिकेत प्रसारमाध्यांनी सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी केलेल्या तोंडी निरीक्षणे आणि टिप्पण्या नोंदवू नयेत आणि केवळ निकालात नोंदवलेल्या निरीक्षणाचा अहवाल द्यावा अशी मागणी केली आहे.

करोनालाट निवडणूक आयोगामुळेच!

“माध्यमांनी दिलेल्या रिपोर्टमुळे निवडणुका पार पडण्याची घटनात्मक जबाबदारी असलेली स्वतंत्र घटनात्मक संस्था म्हणून निवडणूक आयोगाची प्रतिमा डागाळली आहे,” असंही निवडणूक आयोगाने याचिकेत म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने यावेळी राजकीय नेते आपलं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरले असल्याचाही उल्लेख केला आहे. शुक्रवारी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.

येत्या २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीदरम्यान करोना नियमांच्या पालनाचे निर्देश देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णाद्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांच्या खंडपीठाने सोमवारी सुनावणी घेतली. करोना नियमांचे पालन करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत, असे निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयात सांगताच न्यायालयाने आयोगाची कानउघाडणी केली.

मद्रास हायकोर्टाने फटकारल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग; विजयी मिरवणुकांवर बंदी

राजकीय पक्षांना मोठ्या प्रचारसभा आयोजित करण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने करोनाच्या दुसऱ्या लाटेला मार्ग मोकळा करून दिला. करोनाच्या दुसऱ्या लाटेला आयोगालाच जबाबदार धरले पाहिजे, असे मुख्य न्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी नमूद केले. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा आयोगाला दिला होता.

मद्रास उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निकालाच्या दिवशी आणि नंतरही विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष करता येणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 11:50 am

Web Title: election commission moves madras hc over court over blame for covid 19 second wave sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना लसीकरण : पहिल्या ५३ तासांमध्ये २ कोटी २८ लाख ९९ हजार १५७ जणांनी CoWIN वरुन केली नोंदणी
2 …तर आरोग्यमंत्री राजीनामा देणार का?; पी चिदंबरम यांचं जाहीर आव्हान
3 भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन
Just Now!
X