कर्नाटक विधानसभा निवडणुकांचं आज बिगूल वाजणार आहे. पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोग आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. या निवडणुकीचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावर उमटणार आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि सत्तेत परतण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या भाजपमध्ये तेथे चुरशीची लढत आहे.

दक्षिण भारतात आता केवळ कर्नाटकमध्येच कॉंग्रेसची सत्ता असल्याने कर्नाटक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने जोर लावला आहे. कॉंग्रेसकडून अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने कर्नाटक दौ-यावर आहेत, तर भाजपाकडून अमित शहा यांचं कर्नाटकवर बारीक लक्ष आहे. उत्तर प्रदेश लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने कर्नाटक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली आहे.

कर्नाटकची चार विभागांमध्ये विभागणी होते. मुंबई-कर्नाटक (बेळगाव, धारवाड, विजापूर इ.), आंध्र-कर्नाटक (रायचूर, बल्लेरी, गुलबर्गा), म्हैसूर (बंगळूरु, म्हैसूर, मंडय़ा, हसन) आणि सागरी कर्नाटक (उडपी, कारवार, मंगलुरू). येथे लिंगायत, वोक्कालिग, दलित, इतर मागासवर्गीय, मुस्लीम आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या निर्णायक आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्व विभागांमध्ये बाजी मारली होती. सागरी कर्नाटकात भाजपने आव्हान उभे केले आहे. म्हैसूर या विभागात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना मानणारा वर्ग मोठा आहे. ४०च्या आसपास आमदार निवडून आणण्याची देवेगौडा यांच्या जनता दलाची (धर्मनिरपेक्ष) ताकद आहे. मुंबई-कर्नाटक आणि आंध्र-कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि भाजपने ताकद लावली आहे. देवेगौडा यांची सारी मदार ही वोक्कालिग समाजावर आहे. देवेगौडा यांच्या पक्षाने बहुजन समाज पक्षाबरोबर आघाडी करून एकत्र निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. वोक्कालिग, दलित, मागासवर्गीय अशी मोट बांधण्याची ही योजना काँग्रेससाठी त्रासदायक ठरणार आहे. देवेगौडा यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसची निवडणूकपूर्व किंवा नंतर आघाडी करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी कुमारस्वामी हे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कुमारस्वामी हे भाजपला अनुकूल भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जातो. बदलत्या राजकीय परिस्थितीत कुमारस्वामी भाजपला अप्रत्यक्षपणे मदतच करतील, अशी शक्यता वर्तविली जाते. कारण मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे कुमारस्वामी आणि भाजप या दोघांचे कट्टर विरोधक आहेत.
भाजपची सारी मदार लिंगायत समाजावर असतानाच काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म किंवा पंथाचे आश्वासन देत चुचकारले आहे. लिंगायत समाजाला पुढे करीत काँग्रेस जातीपातींचे राजकारण करीत असल्याचा आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे असून, पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्याने हा समाज आपल्या पाठीशी उभा राहील, असा भाजपला विश्वास आहे.