तामिळनाडू विधानसभेची निवडणूक दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना त्या राज्यातून शनिवारी तब्बल रोख ५७० कोटी रुपये जप्त करण्यात आले. तीन कंटेनर्समध्ये सापडलेल्या या रकमेवर कुणीही दावा केला नसल्यामुळे ही ‘सकृद्दर्शनी संशयास्पद रोकड’ असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
तिरुपुर जिल्ह्य़ात तपासणीदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांना तीन कंटेनर्समध्ये ५७० कोटी रुपयांची रोख रक्कम आढळली. ही रक्कम स्टेट बँकेच्या कोइम्बतूर शाखेतून विशाखापट्टणम शाखेत नेत असल्याचे या वाहनांमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते, मात्र त्यांच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने नियमित तपासणीदरम्यान शनिवारी पहाटे पेरुमनाल्लूर- कुन्नाथुर बायपासवर निमलष्करी दलाच्या मदतीने ही रक्कम जप्त केली. प्राप्तीकर विभागासह सर्व यंत्रणांना या प्रकरणी योग्य तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.