News Flash

West Bengal Elections : निवडणूक आयोगाचा दणका, संध्याकाळी ७ ते सकाळी १० सभांवर बंदी!

पश्चिम बंगालमधील प्रचारासंदर्भात निवडणूक आयोगानं करोना नियमांना अनुसरून नवीन सूचना जारी केल्या आहेत.

सौजन्य - ट्वीटर

देशात एकीकडे करोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मात्र, दुसरीकडे पाच राज्यांमधल्या निवडणुकांमध्ये करोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: पश्चिम बंगामध्ये ८ टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठीच्या प्रचारामधून या नियमांचा बोजवारा उडाल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सामान्य नागरिकांना नियमांचं बंधन असताना राजकीय पक्षांच्या प्रचारसभांना हे नियम लागू नाहीत का? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. अखेर निवडणूक आयोगाने त्यावर कठोर पावलं उचलली असून पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी ७ ते सकाळी १० या काळात प्रचारसभांना बंदी घालण्यात आली आहे.

काय आहेत नियम?

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकानुसार पश्चिम बंगालमध्ये १६ एप्रिलपासून निवडणूक संपेपर्यंत संध्याकाळी ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारच्या रॅली, जाहीर सभा, पथनाट्य, नुक्कड सभा करण्यावर बंदी असणार आहे. त्याशिवाय सहाव्या, सातव्या आणि आठव्या अर्थात शेवटच्या टप्प्यासाठी प्रत्येक टप्प्याच्या आधीचा शांतता काळ अर्थात Silence Period हा ७२ तासांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे मतदानाच्या आधी ७२ तास रॅली, जाहीर सभा, पथनाट्य, नुक्कड सभा, बाईक रॅली किंवा कोणत्याही प्रकारे प्रचारासाठी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे.

स्वत:च्याच प्रचार रॅलीतला गर्दीचा व्हिडीओ दाखवत भाजपा नेत्याचं ट्विटरवर सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन!

आयोगानं फटकारलं!

दरम्यान, निवडणूक आयोगानं आपल्या परिपत्रकामध्ये सर्वच राजकीय पक्ष आणि आयोजकांना फटकारलं आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, “प्रचारसभा आणि जाहीर प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे आणि मास्कसंदर्भातले नियम जाहीरपणे पायदळी तुडवल्याचं दिसून आलं आहे. आयोगानं घालून दिलेल्या नियमांची जाहीरपणे पायमल्ली झाली आहे”, असं आयोगाने म्हटलं आहे. त्याशिवाय, स्टार प्रचारक, राजकीय नेते किंवा उमेदवारांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं देखील आयोगानं नमूद केलं आहे.

आयोगानं घेतलेल्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालमध्ये होणारी करोनासंदर्भातल्या नियमांची पायमल्ली थांबू शकेल असं म्हटलं जात आहे. शिवाय, राजकीय पक्ष देखील यापुढील प्रचारादरम्यान अतिरिक्त काळजी घेतील, अशी अपेक्षा देखील वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 9:07 pm

Web Title: election commission slams election campaign in west bengal issues new guidelines pmw 88
Next Stories
1 स्वत:च्याच प्रचार रॅलीतला गर्दीचा व्हिडीओ दाखवत भाजपा नेत्याचं ट्विटरवर सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन!
2 बाप रे!: करोना हवेतून पसरतो, केवळ सोशल डिस्टन्स पुरेसं नाही – लॅन्सेटचा अहवाल
3 ICSE बोर्डाचा दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्या निर्णय!
Just Now!
X