निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूकीची घोषणा केली आहे. यातील दहा जागा उत्तर प्रदेश व एक जागा उत्तराखंडमधील आहे. ही निवडणूक ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, मतमोजणी देखील त्याच होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

करोना महामारीच्या संकटामुळे अनेक महिन्यांच्या शांततेनंतर आता नोव्हेंबर महिना निवडणुकीचा ठरत आहे. या महिन्यात बिहारची विधानसभा निवडणूक पार पडत आहे. तर, आता याचबरोबर उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील राज्यसभेच्या ११ जागांसाठी देखील निवडणूक होत आहे.

याशिवाय निवडणूक आयोगाने मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमधील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या रिक्त जागांवरील पोटनिवडणुकांची देखील घोषणा केलेली आहे. आता याबरोबरच निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधील १० व उत्तराखंडमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

या जागांसाठी राज्य विधानसभेत ९ नोव्हेंबर रोजी मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. रात्री उशीरापर्यंत निकाल देखील हाती येणार आहे. म्हणजेच बिहार विधानसभा, पोटनिवडणुका व राज्यसभेच्या निवडणुकीचा निकाल एकाच दिवशी लागणार आहे.

या नेत्यांचा कार्यकाळ होत आहे पूर्ण –
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, रविप्रकाश वर्मा, चंद्रपाल सिंह यादव आणि जावेद अली खान, तर बहुजन पार्टीचे वीर सिंह आणि राजाराम, भाजपाचे हरदीप सिंह पुरी, अरुण सिंह आणि नीरज शेखर, तर काँग्रेसचे पीएल पुनिया यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपत आहे. याचबरोबर उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे राज बब्बर यांचा देखील कार्यकाळ समाप्त होत आहे.