भारतीय जनता पक्ष आणि ‘जनता परिवार’ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बिहार निवडणुकांचे युद्ध ऑक्टोबरअखेर व नोव्हेंबरची सुरुवात या दरम्यान, म्हणजे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्यापूर्वी राज्याच्या निवडणूक यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता निवडणूक आयोगाचे उच्चपदस्थ बिहारला जाणार असून, त्यापूर्वी वेगवेगळे मुद्दे मार्गी लावण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे आयोगाच्या सूत्रांनी सांगितले. प्रशासनातील उच्चाधिकारी, पोलीस अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करण्याकरिता मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी व निवडणूक आयुक्त अचल कुमार जोती हे पुढील महिन्याच्या सुरुवातीला पाटणा येथे जाणे अपेक्षित आहे.
सणांचे दिवस सुरू होण्यापूर्वी, म्हणजे ऑक्टोबरअखेर किंवा दसरा व दिवाळी या दरम्यानच्या काही तारखा मतदानासाठी निश्चित करण्याची शक्यता निवडणूक आयोग पडताळून पाहत असल्याचे कळते. मतदान किती टप्प्यात होणार याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसला, तरी ते ४ ते ५ दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत असून नवे सभागृह त्यापूर्वी अस्तित्वात येणे आवश्यक आहे. घटनेनुसार, नियत तारखेपूर्वी सहा महिन्यांच्या आत केव्हाही निवडणूक घेतली जाऊ शकते.
दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खावा लागलेला भाजप आपल्या मित्रपक्षांसह बिहार ताब्यात घेण्यासाठी तयारीला लागला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार व राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या युतीचे कडवे आव्हान त्यांच्यापुढे आहे. बिहारनंतर तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ व आसाम यासह विविध राज्ये निवडणुकीला सामोरी जाणार आहेत.
निवडणूक आयोग बिहारमधील मतदारांची अंतिम यादी ३१ जुलैला प्रकाशित करण्याच्या तयारीत असतानाच आयोगाने राज्यात पाठवलेल्या एका चमूने निवडणूक यंत्रणेच्या तयारीची शुक्रवारी आयोगाला माहिती दिली. मतदार यादी तयार करण्यातील प्रगती, संवेदनशील मतदारसंघ निश्चित करणे, तसे मतदार यादीत नावे नोंदवण्यासाठी मतदारांचे प्रबोधन याचा माहितीत समावेश होता.
निवडणुकीचे अंतिम वेळापत्रक तयार करण्यापूर्वी निवडणूक आयोगाला हवामानविषयक परिस्थिती, सण, परीक्षा, सुटय़ा, मान्सूनचा जोर, मुसळधार पाऊस आणि पूर हे घटकही विचारात घ्यावे लागणार आहेत.