निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार; नक्षलस्फोटात जवान शहीद 

छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान १२ तासांवर आले असताना नक्षलवाद्यांनी रविवारी घडवलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला, तर पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला.

सीमा सुरक्षा दलाचे पथक सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या पाश्वभूमीवर कांकेरजिल्हय़ातील जंगलात मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. त्यात सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक महेंद्र सिंह गंभीर जखमी झाले. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रायपूरचे पोलीस महानिरीक्षक दीपांशू काब्रा यांनी दिली. बिजापूर जिल्ह्य़ातील एका घटनेत विशेष कृती दल गस्त घालत असताना सुरक्षा दलाच्या वेशात समोर आलेल्या एका माओवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले.

छत्तीसगडमध्ये सोमवारी पहिल्या टप्प्यात बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांतील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांत नक्षलवाद्यांनी सहा हल्ले केले. त्यापैकी तीन हल्ले गंभीर होते. त्यांत दूरदर्शनच्या कॅमेरामनसह १३ नागरिकांचा मृत्यू झाला. गेल्या दहा दिवसांत बस्तर आणि राजनांदगाव जिल्ह्य़ातून ३०० आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.

एक लाख सुरक्षारक्षक तैनात

मतदानासाठी सुमारे एक लाख जवान तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षा दलांच्या ६५० कंपन्या म्हणजे सुमारे ६५ हजार जवान डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस इत्यादी निमलष्करी दलांसह राज्य पोलीस यंत्रणांचा समावेश आहे. याशिवाय, राज्य सुरक्षा यंत्रणाच्या दोनशे तुकडय़ाही आधीपासूनच नक्षलग्रस्त भागात तळ ठोकून आहेत, अशी माहिती विशेष महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली.

पहिला टप्पा

छत्तीसगड विधानसभेच्या ९० जागांसाठी १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत मतदान होत आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यात बस्तर, कांकेर, सुकमा, बिजापूर, दंतेवाडा, नारायणपूर, कोंडागाव आणि राजनांदगाव या नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांतील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. २०० संवेदनशील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्यात आला. मतमोजणी मात्र ११ डिसेंबरला होईल.