सदोष ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या तक्रारींचे गालबोट

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत बुधवारी एकूण ६५.५ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानापेक्षा हे प्रमाण ७ टक्क्य़ांनी कमी आहे. २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ७२.६९ टक्के मतदान झाले होते, असे एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.

बुधवारच्या मतदानाला इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफायल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट) सदोष असल्याच्या तक्रारींचे गालबोट लागले. तांत्रिक बिघाडाच्या तक्रारी मिळाल्यानंतर ११४५ ईव्हीएम आणि १५४५ व्हीव्हीपॅट बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यातील २२७ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ य वेळेत मतदान झाले; तर नक्षलग्रस्त बालाघाट जिल्ह्य़ातील लांजी, परसवाडा व बैहर या तीन मतदारसंघांत सकाळी ७ ते दपारी ३ या वेळेत मतदान घेण्यात आले, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही.एल. कंठा राव यांनी सांगितले.

बुधवारच्या मतदानादरम्यान सुमारे २.५ टक्के मतदान यंत्रे बदलण्यात आली. अलीकडेच निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये हेच प्रमाण सुमारे २ टक्के होते, असे राव म्हणाले. धार, इंदोर व गुणा जिल्ह्य़ांमध्ये कर्तव्य बजावताना ‘आरोग्यविषयक कारणांमुळे’ ३ कर्मचारी मरण पावल्याचेही त्यऋंनी सांगितले.

मिझोराममध्ये ७५ टक्के मतदान

नवी दिल्ली : मिझोराम विधानसभा निवडणुकीत बुधवारी ७५ टक्के मतदान झाले. या राज्यात सर्व ४० मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. मिझाराममध्ये एकूण ७,७०,३९५ मतदार आहेत. १५ महिलांसह एकूण २०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. ४७ केंद्रे ‘नाजुक’ आणि तितकीच संवेदनशील होती.