कर्नाटकमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वीच काँग्रेस आणि भाजपा एकमेकांवर प्रखर टीका करताना दिसून येत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर झालेल्या शाब्दिक युद्धानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. सिद्धरामय्या यांनी काँग्रेसला पांडवांची तर भाजपाला कौरवाची उपमा दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

बेंगळुरू येथील एका कार्यक्रमादरम्यान सिद्धरामय्या म्हणाले की, निवडणुका युद्धाप्रमाणे असतात. आम्ही पांडव आहोत, जे योग्य रस्त्यावर चालले आहेत. तर भाजपाचे लोक कौरव आहेत, जे चुकीच्या रस्त्यावर मार्गक्रमण करत असतात.

यापूर्वी सिद्धरामय्या यांच्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडवून दिली होती. याच महिन्यात चमाराजनगर जिल्ह्यात पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलात दहशतवादी तत्वं असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते भाजपा नेत्यांच्या निशाण्यावर आले होते. भाजपाने हिंदू टेररशी हे जोडून जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला होता. वाद चिघळत असल्याचे पाहताच सिद्धरामय्या यांनी मी भाजपा आणि संघात काही हिंदू कट्टरपंथी तत्व असल्याचे म्हटले होते. मी त्यांना दहशतवादी म्हटले नव्हते, असे स्पष्टीकरण त्यांना द्यावे लागले होते. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सिद्धरामय्या यांना अशा शब्दांपासून दूर राहा असा सल्ला दिला होता.