करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द झाल्याची माहिती आज संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. मात्र, हा निर्णय घेण्या अगोदर आमच्याशी चर्चा करण्यात आली नसल्याचे सांगत काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. तसेच, आता या पार्श्वभूमीवप मोदी सरकारवर काँग्रेस नेत्यांकडून निशाणा देखील साधला जात आहे.

करोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी अधिवेशन रद्द करण्यासाठी अनुकूलता दर्शवली. आता थेट जानेवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल असे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांना पाठवलेल्या पत्रात सांगितेले आहे.

तर, “करोना काळात NEET/JEE व IAS साऱख्या परीक्षा शक्य आहेत. शाळांमध्ये वर्ग, विद्यापीठांमध्ये परीक्षा शक्य आहेत. बिहार-बंगालमध्ये निवडणूकीच्या प्रचार सभा शक्य आहेत. मग संसदेचे हिवाळी अधिवेश का नाही? जर संसदेत जनतेचे मुद्देच मांडले जाणार नाही तर लोकाशाहीचा अर्थ काय राहील?” असा प्रश्न सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे पंतप्रधान मोदींना विचारला आहे.

करोना व्हायरसमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी वादग्रस्त कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याची मागणी केली होती. सध्या दिल्लीच्या सीमेवर या कृषी कायद्यांवरुन जोरदार आंदोलन सुरु आहे. या कृषी कायद्यांमध्ये काही दुरुस्त्या करण्याची आवश्यकता आहे असे अधीररंजन चौधरी यांनी म्हटले होते.

… मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार? – सचिन सावंत

दरम्यान, “काँग्रेस प्रवक्त सचिन सावंत यांनी देखील या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे अशी बोंब ठोकत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. मोदी सरकारने तर कोविडमुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्दच केले. मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार?” असं सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.