News Flash

बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक

करोनाकाळातील पहिली निवडणूक २८ ऑक्टोबरपासून

प्रातिनिधीक छायाचित्र

बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. फेब्रुवारीमध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर, करोनाच्या आपत्तीमुळे जग पूर्ण बदलून गेले असून नव्या परिस्थितीत आयुष्यातील घडामोडींचा विचार करावा लागत आहे. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणूक ही जगभरातील मोठी निवडणूक असेल. लाखो विद्यार्थ्यांनी नीट आणि जेईई परीक्षा दिल्या आहेत. लोकांचे आरोग्य सांभाळून लोकप्रतिनिधींची निवडप्रक्रिया पार पाडण्यासाठी मार्ग काढावा लागत आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले. जगभरात ७० देशांनी निवडणुका रद्द केल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जागावाटप अनुत्तरित

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदावर दावा करत असून त्यासाठी बिहारचा विकास आणि राज्याची अस्मिता या दोन मुद्दय़ांवर प्रामुख्याने प्रचारात भर असेल. तर महाआघाडीच्या वतीने शेती विधेयके, पूरपरिस्थिती, बेरोजगारी, स्थलांतरित मजुरांचा प्रश्न, करोनाची हाताळणी असे मुद्दे नितीशकुमार यांच्या विरोधात वापरले जातील. एनडीमध्ये रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष व जितन मांझी यांचा हिंदुस्थान अवामी मोर्चाही सहभागी असेल. त्यामुळे एनडीएतील जागावाटपाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. गेल्या वेळी २०१५मध्ये नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून सत्ता मिळवली होती. त्यात लालूंच्या पक्षाला सर्वाधिक ८० जागा मिळाल्या होत्या. जनाता दल ७१, भाजप ५३ तर काँग्रेस २७ जागा मिळाल्या होत्या.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी का? 

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी का देण्यात आली त्याची कारणेही राजकीय पक्षांना द्यावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तींना उमेदवारी का नाकारण्यात आली त्याचे स्पष्टीकरणही द्यावे लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती पक्षाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर टाकणे बंधनकारक आहे.

सूचना काय?

* मतदानाचा अखेरचा एक तास करोनामुळे विलगीकरणात असलेल्या रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे.

* निवडणूक प्रचार शारीरिक अंतर राखूनच व्हायला हवा.

* ८० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींसाठी टपाल मत देण्याची मुभा.

* निवडणुकीसाठी ७ लाख विषाणूरोधक, ४६ लाख मुखकवच, ६ लाख पीपीई किट्स, ६.७ लाख मुखरक्षक कवच, २३ लाख जोडी हातमोजे पुरवले जातील.

* घरोघरी जाऊन प्रचार करताना तीनपेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाला मनाई. प्रचारासाठी १० ऐवजी फक्त ५ मोटारींना परवानगी.

* मतदारांनी मुखकवच वापरणे सक्तीचे. तापमान बघूनच मतदानाची परवानगी दिली जाईल.

* प्रत्यक्ष प्रचारावर बंदी घातलेली नाही. रोड शो, मोर्चा यांच्या आयोजनाबाबत तसेच, किती जणांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यायची हे स्थानिक प्रशासन ठरवेल.

बिहार : एकूण जागा – २४३

मतदानाचे टप्पे

पहिला टप्पा

२८ ऑक्टोबर  ७१ जागा

दुसरा टप्पा

३ नोव्हेंबर

९४ जागा

तिसरा टप्पा

७ नोव्हेंबर ७८ जागा

* मतमोजणी – १० नोव्हेंबर

* २९ नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:19 am

Web Title: elections in bihar in three phases abn 97
Next Stories
1 बिहारमधील आघाडय़ांचे चित्र अस्पष्टच!
2 राज्यांसाठीच्या जीएसटी निधीचा केंद्राकडून इतरत्र वापर
3 ‘संडे टाइम्स’चे माजी संपादक हॅरॉल्ड इव्हान्स यांचे निधन
Just Now!
X