पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीची जाहिरात करणारे लावण्यात आलेले फलक हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याने ते हटविण्यासाठी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी आयोगाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असतानाही पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारची कामगिरी यांची जाहिरात करणारे फलक देशभर सार्वजनिक ठिकाणी आणि पेट्रोल पंपांवर लावण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे, असे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.

कामगिरीचे फलक लावण्यात आल्याने केवळ आचरसंहितेचाच भंग झालेला नाही तर प्रचारासाठी सार्वजनिक निधी आणि शासकीय यंत्रणा यांचाही गैरवापर झाला आहे, असे शिष्टमंडळातील नेत्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

सर्व फलक त्वरित हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने द्यावेत आणि आदेशाचे पालन करण्यात आले आहेत की नाही याचा अहवालही द्यावा, अशी मागणी काँग्रेसने आयोगाकडे केली आहे.

प्रियंका पुढील आठवडय़ात पूर्व उत्तर प्रदेशातून प्रचाराला सुरुवात करणार

जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी नदीमार्गाचा वापर करून पूर्व उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि वाराणसीतून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. येत्या १८ मार्च रोजी त्या प्रचाराला सुरुवात करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रामध्ये, प्रियंका यांच्या १८ ते २० मार्चदरम्यानच्या प्रयागराज ते वाराणसी दौऱ्यासाठी परवानगी मागण्यात आली. प्रियंका मोटर बोटीचा वापर करून नदीमार्गाने १०० कि.मी.चे अंतर पार करणार आहेत आणि त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी परवानगी घेणे गरजेचे आहे.

प्रियंका १७ मार्च रोजी लखनऊमध्ये येणार असून दुसऱ्या दिवशी प्रचारासाठी प्रयागराजला रवाना होणार आहेत. प्रियंकांच्या दौऱ्यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, असे काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी सांगितले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आरोग्य सेवा हक्क कायद्याचे आश्वासन?

सर्वासाठी किमान आरोग्य सेवेची हमी देण्यासाठी लोकसभेच्या निवडणूक जाहीरनाम्यात आरोग्य सेवा हक्क कायद्याचा (राइट टू हेल्थकेअर अ‍ॅक्ट) समावेश करण्याचा काँग्रेस पक्ष विचार करीत असल्याचे शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आयुष्मान भारत योजनेवरही गांधी यांनी या वेळी टीका केली. सदर योजना निवडक १५-२० उद्योगपतींसाठी असल्याचे ते म्हणाले. येथील एका स्वयंसेवी संस्थेने आरोग्यविषयक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते त्याच्या समारोपप्रसंगी गांधी वैद्यकीय व्यावसायिकांशी बोलत होते.

सर्व भारतीयांना किमान आरोग्य सेवेची हमी देण्यासाठी आरोग्य सेवा हक्क कायदा, जीडीपीच्या तीन टक्के आरोग्यविषयक खर्चात वाढ करणे आणि डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या संख्येत वाढ करणे या तीन गोष्टींचा समावेश जाहीरनाम्यात करण्याचा आम्ही विचार करीत आहोत, असे गांधी म्हणाले. भारतीयांच्या संरक्षणासाठी २१ व्या शतकामध्ये कोणत्याही सरकारने या तीन गोष्टी केल्याच पाहिजेत. बेरोजगारीच्या समस्येची दखल घेणे, कमी खर्चामध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देणे आणि उत्तम आरोग्य सेवेची खात्री देणे या त्या तीन गोष्टी आहेत, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना खोटी आश्वासने दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना मुख्यत्वे शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन फसविले असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे केला. मात्र निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या पक्षाने दिलेला शब्द पाळला, असेही ते म्हणाले.

आम्ही जे बोलतो तेच करतो, आम्ही शब्दांचे नेहमीच कृतीत रूपांतर करतो, मोदी यांच्याप्रमाणे काँग्रेस खोटी आश्वासने देत नाही, असे राहुल गांधी यांनी येथे काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केले. दिलेली आश्वासने आम्ही पाळली आहेत आणि ते आपण छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पाहू शकता, असेही ते म्हणाले.

या तीन राज्यांमध्ये आमचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, तर छत्तीसगडमध्ये पिकासाठी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विण्टल २५०० रुपयांपर्यंत वाढविली, आम्हाला ओदिशातील शेतकऱ्यांनाही हाच संदेश द्यावयाचा आहे की काँग्रेस तुमच्यासमवेत आहे, असेही गांधी म्हणाले.