२८२ मतदारसंघांत गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या जास्त

|| रविश तिवारी, रितिका चोप्रा

येत्या लोकसभा निवडणुकीत नवमतदारांच्या हाती निकालाचे भवितव्य राहणार आहे. २९ राज्यांतील २८२ मतदारसंघांतील नवमतदारांची संख्या ही गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगाकडील तपशिलातून ही बाब समोर आली आहे.

१९९७ ते २००१ दरम्यान जन्म झालेलेले हे मतदार गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानास पात्र नव्हते. यंदा प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी १.४९ लाख जण पहिल्यांदा पात्र मतदार राहणार आहेत. हा आकडा २०१४ साली २९७ जागांवरील मताधिक्यापेक्षा जास्त आहे. अर्थात यापैकी काही मतदारांना २०१४ नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाची संधी मिळाली आहे. मात्र लोकसभेसाठी ते पहिल्यांदाच मतदान करतील. देशातील विभागीय राजकारणाचे महत्त्व पाहता गेल्या राज्यवार सरासरीत जे प्रथम मतदार आहेत (१८ ते २२ वयोगट) त्यांची तुलना करावी लागेल. या तपशिलाचा अभ्यास करता किमान २८२ मतदारसंघांत या नवमतदारांचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या बहुमताच्या आकडय़ापेक्षाही ती जास्त आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादीत समाविष्ट झालेल्यांच्या आधारे हे विश्लेषण आहे.

या २८२ लोकसभा जागांपैकी २१७ जागा या १२ मोठय़ा राज्यांतील आहेत. त्यात पश्चिम बंगाल ३२ जागा, बिहार २९, उत्तर प्रदेश २४, कर्नाटक व तमिळनाडू प्रत्येकी २०, राजस्थान व केरळ प्रत्येकी १७, झारखंड १३, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश प्रत्येकी १२, मध्य प्रदेश ११ तसेच आसाम १० जागा ही काही महत्त्वाची राज्ये आहेत. या राज्यांमध्ये या जागा पाहता जे नवमतदार आहेत त्यांची संख्या गेल्या वेळच्या मताधिक्यापेक्षा जास्त आहे.

उत्तर प्रदेश हे केंद्रातील सत्तेच्या दृष्टीने निर्णायक राज्य आहे. तिथे सर्वसाधारणपणे १ लाख १५ हजार नवमतदार प्रत्येक ठिकाणी आहेत. गेल्या वेळी सर्वसाधारणपणे मताधिक्याची सरासरी १ लाख ८६ हजार होती. राज्यातील दोन प्रमुख पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यामुळे आता नवमतदारांच्या हाती राजकीय पक्षांचे भवितव्य आहे.

आठ कोटी नवमतदार

एकूण जवळपास ८ कोटी मतदार हे पहिल्यांदाच हक्क बजावणार आहेत. आता त्यांचे मत केंद्रातील बहुमतासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.