राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १६.३ टक्के मतदान

दहशतवादाचा सामना करणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या शनिवारी झालेल्या तिसऱ्या टप्प्यात फक्त ३.४९ टक्के मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. जम्मूच्या सांबा जिल्ह्य़ात सर्वाधिक, म्हणजे ८० टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात तिसऱ्या टप्प्यात एकूण १६.३ टक्के मतदान झाले.

बारामुल्ला जिल्ह्य़ातील सीमेवरील उरी शहरात मात्र ७५.३४ टक्के मतदानाची नोंद झाली. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी व माकप यांसारख्या पक्षांच्या बहिष्कराच्या आवाहनानंतर चारपैकी पहिल्या दोन टप्प्यांत या ठिकाणी कमी मतदान झाले होते. या ठिकाणी ३५५२ जणांची नावे मतदार यादीत होती.

तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या श्रीनगर महापालिकेच्या २० वॉर्डामध्ये १.५३ लाख पात्र मतदारांपैकी फक्त १.८४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अनंतनाग महापालिकेतील शिरपोरा वॉर्डात फक्त १.३९ टक्के मतदारांनी मतदान केले.

तिसऱ्या टप्प्यात १५१ वॉर्डामध्ये निवडणूक होणार असली, तरी फक्त ४० वॉर्डात मतदान घेण्यात आले. ४९ वॉर्डामध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले, तर ६२ वॉर्डामध्ये उमेदवारी अर्जच भरण्यात आले नाहीत. काश्मीर खोऱ्यात ८ ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या टप्प्यात ८.३ टक्के, तर दोन दिवसांनी झालेल्या दुसऱ्या टप्प्यात केवळ ३.४ टक्के मतदान झाले होते.

मन्नान वानी याच्यावरून गंभीर-अब्दुल्ला जुंपली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांशी झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी मन्नान याच्यावरून क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यात ट्वीटयुद्ध सुरू झाले आहे. मन्नान याच्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांला शिक्षण सोडून गोळ्या खाव्या लागल्या, त्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांना पश्चात्ताप झाला पाहिजे, असे लिहून गंभीर याने अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, काँग्रेस, भाजपला टॅग केले, त्यावरून अब्दुल्ला आणि गंभीर यांच्यात शाब्दिक चकमक झडली आहे. मन्नानचा मृत्यू : आम्ही एका दहशतवाद्याला मारले आणि कट्टर स्वाभावाच्या एका प्रतिभेला नष्ट केले, असे गंभीर याने ट्वीट केले. त्यावर अब्दुल्ला संतप्त झाले. मन्नानचे घर ज्या जिल्ह्य़ात आहे तो जिल्हा गंभीर याला नकाशावरही शोधता येणार नाही आणि हा काश्मिरी युवकांच्या हाती बंदूक का आली त्याची कारणे मांडत आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

पुलवामातील चकमकीत दहशतवादी ठार

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला आहे. सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ात बाबगुंड येथे काही भागाला वेढा घातला होता. रात्रीच्या वेळी तेथे दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी सांगितले, की शोध मोहीम सुरू असताना त्याचे रूपांतर चकमकीत झाले. दहशतवाद्यांनी सुरक्षादलांवर गोळीबार केला असून सकाळच्या वेळी या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. साबीर अहमद दर हे मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव असून तो हिज्बुल मुजाहिद्दीनचा आहे. काही शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नंतर ही मोहीम थांबवण्यात आली आहे.