नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये लवकरात लवकर  पारदर्शक वातावरणात निवडणुका घेतल्या जातील आणि तेथील तरुणांना आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्रीही होता येईल, असे सांगत अनुच्छेद ३७० रद्द झाल्याने काश्मीरचा वेगाने विकास होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिली.

अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्द झाल्यानंतर तीन दिवसांनी देशवासियांना उद्देशून ‘दूरदर्शन’वरून दिलेल्या विशेष संदेशात त्यांनी परिस्थिती निवळताच काश्मीरचा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मागे घेतला जाईल आणि ते स्वतंत्र राज्य म्हणून कार्यरत राहील, असे नमूद केले. अर्थात लडाख हा केंद्रशासितच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या अनुच्छेदामुळे दहशतवाद, भ्रष्टाचार आणि काही कुटुंबांच्या कब्जात असलेल्या राजकारणापलीकडे सर्वसामान्य लोकांच्या पदरात काहीच पडले नाही. उलट या अनुच्छेदाचा आधार घेत पाकिस्तानला गैरमार्गाने गैरलाभ मिळवता येत होता. त्यांनी पसरवलेल्या दहशतवादापायी ४२ हजार निर्दोष नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि विकासापासून वंचित राहावे लागले. आता हा अनुच्छेद संपुष्टात आल्याने दीड कोटी काश्मीरवासियांचे वर्तमान तर सुधारेलच, पण भविष्यही सुधारेल. ही या प्रदेशासाठी नवी पहाट आहे, असे ते म्हणाले.

काश्मीरमधील नागरिकांना आता देशातील सर्व योजनांचा समान लाभ घेता येणार आहे. अन्य केंद्रशासित प्रदेशांप्रमाणेच येथील पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळणार आहेत. हा अनुच्छेद नसल्याने आता काश्मीरमधील पर्यटन तसेच अन्य उद्योगांना तसेच शेती क्षेत्राला मोठा वाव मिळेल. इथे केवळ देशातील चित्रपटांचेच चित्रीकरण होणार नाही, तर परदेशी चित्रपट निर्मातेही इथे चित्रीकरणासाठी येतील, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील सर्व वित्तीय पदे भरली जातील, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडूनही नोकर भरती होईल. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील. सेनादलांमध्ये स्थानिक तरुणांना भरती होता यावे यासाठी खास मेळावे घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले. काश्मिरी तरुणांना खेळाची मैदाने गाजवता यावीत आणि त्यांनी जगात भारताचे नाव मोठे करावे, अशी आमची इच्छा आहे, असेही त्यांनी सांगितले.

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता नांदू लागली तर विश्वशांतीसाठीही त्याचा मोठा उपयोग होईल, असे नमूद करीत मोदी यांनी सरकारचे पाऊल हे दहशतवादाविरोधात आणि शांततेसाठीच आहे, हे अधोरेखित केले.

अनेकदा काही गोष्टी या सवयीमुळे कायमच्याच वाटू लागतात. अनुच्छेद ३७०चे तसे झाले होते. या अनुच्छेदाच्या अस्तित्वामुळे जम्मू काश्मीरमधील आमच्या नागरिकांची जी खरी हानी होत होती, ती दुर्लक्षितच राहिली होती. हा अनुच्छेद रद्द व्हावा अशी सरदार वल्लभभाई पटेल, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटलजींबरोबरच कोटय़वधी देशभक्तांची भावना होती. ती आता पूर्ण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

सोमवारी असलेल्या ईदसाठीही त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. काश्मीरमध्ये ईद साजरी करण्यात कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.

विरोधाची जाणीव

अनुच्छेद ३७० रद्द करण्यावरून ज्या विरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत त्यांचाही आम्ही आदर करतो. त्या प्रत्येक आक्षेपाला आम्ही उत्तर देऊ, पण विरोधकांनी देशहिताच्या दृष्टीकोनातून या विषयाकडे पाहिले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

जवानांचे आभार

जम्मू आणि काश्मीरमध्ये आजवर आपल्या प्राणांची बाजी लावून पाय रोवलेल्या कर्तव्यरत जवानांचे आणि पोलिसांचेही मोदी यांनी आभार मानले.