पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अनेकदा पक्षी व माणसेही मरतात त्यावर उपाय म्हणून तेलंगणातील दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात दूरनियंत्रित पंतगांचा वापर केला जाणार आहे. या पतंगांना दोरीच नसेल. १२ ते १७ जानेवारीदरम्यान हा महोत्सव होणार आहे.

पतंगाच्या मांजात काच वापरली जाते तसेच चिनी मांजा हा नायलॉनचा असतो त्यामुळे अनेकदा पक्षी व माणसे गळा चिरून मृत्युमुखी पडतात. आगा खान अकादमीचे जॉफ्री फिशर यांनी सांगितले की, पारंपरिक पतंग हे दोऱ्याच्या मदतीने उडवले जातात पण दूरनियंत्रित पतंग ही या क्षेत्रातील क्रांती आहे ती भारतात अजून पुरेशी आलेली नाही. दूरनियंत्रित पतंगाचा अनुभव भारतीयांनाही आनंद देईल यात शंका नाही.

हैदराबाद येथे पीपल्स प्लाझा येथे दूरनियंत्रित पतंग हे १२ जानेवारीला उडवले जाणार आहेत. काईट २०१७ हा पतंग महोत्सव खरेतर मुलींच्या शिक्षण सक्षमीकरणासाठी आहे त्यातून पर्यटन व सांस्कृतिक वारसा हे उद्देशही साध्य होतात. १६ देशातील पतंगबाज येथे येतात तसेच एकूण १० क्लबचे भारतीय तेथे सहभागी होतात. तेलंगणा टूरिझम व इन्क्रेडिबल इंडिया यांनी एकत्र येऊन आगा खान अकादमीच्या मदतीने हा महोत्सव अकादमीच्या १०० एकर जागेत आयोजित केला आहे. ऑलिंपिकमधील रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू यावेळी उपस्थित राहणार आहे.

महाराष्ट्रात मांजावर बंदी

संक्रांतीनिमित्त पतंग मोठय़ा प्रमाणावर उडवले जातात पण निष्काळजीपणामुळे मांजाचा फास लागून अनेकदा पक्षी व माणसे मृत्युमुखी पडतात, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने मांजावर बंदी घातली आहे. विशेष करून ही बंदी नायलॉनच्या मांजावर आहे. राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने मांजावर बंदी जारी केली आहे. २०१५ मध्ये पेटा, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशात मांजावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता  केंद्रीय पर्यावरण खात्याने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मांजावर बंदी घालण्याची पत्रे पाठवली आहेत. महाराष्ट्र सरकारने केवळ मांजावर बंदी घातली आहे असे नाही तर त्याचा साठा करण्यावरही बंदी घातली आहे असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ कलम ५ अन्वये ही बंदी घातली असून त्यात माणसे व पक्षी यांना दोऱ्यामुळे इजा पोहोचणे हा मुद्दा ग्राह्य़ धरला आहे. मांज्यामुळे रस्ते अपघातही होतात त्यामुळे त्यावर बंदी घातली आहे.