कडाडून पडणारी वीज नक्की केव्हा पडेल यांची माहिती ३० मिनिटे आधी देणारी यंत्रणा विकसित केल्याची माहिती शास्त्रज्ञांनी शुक्रवारी येथे दिली आहे. ३० किलोमीटर त्रिज्येच्या आत वीज नक्की केव्हा कोसळेल यांची माहिती देणारी अतिशय सोपी आणि फार खर्चीक नसणारी ही यंत्रणा आहे.

वीज कोसळणे ही निसर्गातील अंदाज व्यक्त न करता येणारी क्रिया आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होत असते. आग लागून घरंच नव्हे तर जंगलं नष्ट होतात. विमानांची उड्डाणे विजांच्या कडकडात रद्द करावी लागतात.

हे सर्व टाळण्यासाठी वीज केव्हा पडेल हे सांगणारी सोपी आणि महागडी नसणारी यंत्रणा आतापर्यंत उपलब्ध नव्हती. मात्र स्वित्र्झलडमधील इकोल पॉलीटेक्निक फेडेरल द लौवसानच्या शास्त्रज्ञांनी एक लहानशी यंत्रणा शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. या यंत्रणेविषयी माहिती ‘क्लायमेट अ‍ॅण्ड अ‍ॅटमॉसफेरिक सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाली आहे. हे नियतकालिक हवामानविषयक आणि कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक संशोधन प्रकाशित करत असते.

सध्या वीज केव्हा पडेल हे सांगणारी यंत्रणा अतिशय किचकट, धिमी आणि खर्चीक आहे. त्यासाठी रडार किंवा उपग्रह यंत्रणा आवश्यक आहे. मात्र नवीन यंत्रणेत हवामान खात्याद्वारे संकलित केलेली माहिती वापरण्यात येते. ज्याने रडार किंवा उपग्रह यंत्रणा पोहोचू शकत नाही अशा संज्ञापनाची साधने उपलब्ध नसणाऱ्या अतिशय दुर्गम भागातही पोहोचता येते, असे ही यंत्रणा विकसित करणारे पीच.डी.चे विद्यार्थी अमिर्थोसिन मोस्ताजाबी यांनी सांगितले.

स्थानिक हवामान खात्यांकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे वीज पडण्याविषयी अंदाज लवकर व्यक्त करून तो तातडीने प्रसारित करता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

वीज पडण्यापूर्वीची स्थितीचे विश्लेषण करणारे यंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वित्र्सलडमधील शहरी आणि पर्वतीय प्रदेशांतील १२ हवामान स्थानकांमधून १० वर्षांची माहिती गोळा केली. त्या माहितीचा वापर करून विश्लेषक यंत्रणेने ३० किलोमीटर परिसरात वीज कधी पडेल यांची अचूक माहिती दिली. या यंत्रणेसाठी वातारवणाचा दाब, हवेचे तापमान, आद्र्रता आणि हवेचा वेग हे चार निकष वापरण्यात आले. हवामान खात्याने संकलित केलेल्या माहितीचा वापर करून वीज पडण्याचा अंदाज वर्तवणारी अतिशय सोपी यंत्रणा संशोधकांनी प्रथमच शोधून काढल्याचा दावा त्यांनी केला आहे.