देशातील सगळ्या गावांमध्ये वीज पोहचली ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी थाप आहे त्यावर विश्वास ठेवू नका असे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा ५ लाख ८० हजार गावांमध्ये वीज पोहचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी त्यांच्या भाषणांमध्ये म्हटले होते की आम्ही १८४५२ गावांमध्ये वीज पोहचवणार आहोत. मग मला त्यांना विचारायचे आहे की जर तुम्ही सत्तेवर आलेले असताना १८ हजार ४५२गावांमध्ये वीज नव्हती हे तुम्हीच म्हणाला होतात. मग देशातल्या सगळ्या गावांमध्ये वीज पोहचवल्याचे श्रेय कसे लाटता? असेही त्यांनी विचारले आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. अशात बेरोजगारी हा सगळ्यात मोठा मुद्दा देशासमोर आ वासून उभा आहे. या समस्येतून सोडवणूक न केल्याने देशातील तरुण वर्ग मोदींच्या विरोधात मतदान करेल अशी खात्री वाटत असल्याचेही चिदंबरम यांनी म्हटले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत मात्र तिथे तरूणांना नोकरी दिली जात नाहीये. मोदी सरकार हे बेरोजगारी वाढवणारे बेजबाबदार सरकार आहे. भारतासारख्या देशात जिथे तरूणांना नोकरीची गरज अत्यंत महत्त्वाची असते अशा ठिकाणी बेकारीची समस्या आहे हे खरोखरच चकित करणारे आहे.

हे म्हणणे खूप सोपे आहे की नोकरी देणारे बना, नोकरी करणारे नाही. पण जर सगळेच नोकरीवर इतरांना ठेवू लागले तर नोकरी कोण करणार हा विचार केला आहे का? जगभरातले बहुतांश लोक नोकरी करतात त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. भारत जगापेक्षा वेगळा नाही. आपल्या समोर रोजगार निर्मिती हे सर्वात मोठे आव्हान आहे असेही पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.

आजच्या घडीला देशात एक मोठा युवक वर्ग असा आहे ज्यांच्या हाताला काम हवे आहे पण मिळत नाही. देशात किमान एक लाख अशा शाळा आहेत जिथे शिक्षकांची गरज आहे. या एक लाख शाळांमध्ये प्रत्येकी १ शिक्षक आहे. अशा शाळांमध्ये जर चार-चार शिक्षक नेमले तरीही बेकारीची समस्या दूर होईल असाही सल्ला चिदंबरम यांनी दिला आहे.