भारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगात विशेष महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या एच १ बी व्हिसाची इलेक्ट्रॉनिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २०२१ या वर्षांसाठीची ही नोंदणी असून कामासाठी व्हिसाची मागणी करणाऱ्यांची संख्या यात जास्त होती.

दरम्यान, १ एप्रिल २०२० पासून नवीन अर्ज माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांकडून स्वीकारण्यात येणार आहेत. एच १ बी व्हिसा हा अस्थलांतरित स्वरूपाचा असून त्यात अमेरिकी कंपन्या कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकतात, किंबहुना त्यासाठीच हा व्हिसा दिला जातो.

अमेरिकी  तंत्रज्ञान कंपन्या या चीन व भारतातील तंत्रज्ञांवर जास्त विसंबून आहेत. व्हिसा अर्ज मंजूर करण्याचा अधिकार हा अमेरिकन नागरिकत्व व स्थलांतर सेवा संस्थेला असून एच १ बी व्हिसाची २०२१ मधील इलेक्ट्रॉनिक नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यापुढील आर्थिक वर्षांसाठी  १ एप्रिल २०२० पासून व्हिसा अर्ज स्वीकारण्यात  येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक व्हिसा पद्धतीने कागदपत्रे कमी झाली असून माहिती आदानप्रदान सोपे झाले आहे, तसेच नियोक्तयांचा खर्चही वाचला आहे.

नवीन पद्धतीत कर्मचाऱ्यांची मूलभूत माहिती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिली जाते. आता १ मार्च  ते २० मार्च २०२० या काळात या व्हिसा अर्जाची अंतिम छाननी होणार आहे.

जर ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पात्र अर्ज असतील तर यादृच्छिक पद्धतीने निवड  केली जाते. प्रत्येक आर्थिक वर्षांत ६५००० एच१ बी व्हिसा देण्याची मर्यादा घालून दिलेली आहे त्यात पहिले २० हजार व्हिसा हे अमेरिकेतील पदव्युत्तर पदवी असलेल्यांना दिले जातात. ते  व्हिसा संख्या मर्यादेत धरले जात नाहीत. ना नफा संशोधन संस्था, उच्च शिक्षण संस्था यात काम करणाऱ्या उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांच्या वतीने केलेले अर्जही या मर्यादेत गणले जात नाहीत.