मुख्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण

मतदान यंत्रांमध्ये घोळ करण्याचे निवडणूक आयोगाचे आव्हान स्वीकारण्यासाठी शनिवारी कुठलाच राजकीय पक्ष पुढे आला नाही. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान यंत्राची पद्धती समजून घेण्यासाठी या प्रक्रियेत सहभाग घेतला होता, त्यात घोळ करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले नाही, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसिम झैदी यांनी स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मतदान यंत्रात घोळ असल्याचा आरोप अनेक पक्षांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र ते सिद्ध करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याचे चित्र होते.

माकपने मतदान यंत्रांच्या प्रक्रियेबाबत पूर्णपणे समाधान व्यक्त केल्याचा दावा झैदी यांनी केला. माकप व राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान यंत्रांमध्ये घोळ करण्याचे आव्हान स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट करत प्रक्रिया समजून घेणार असल्याचे जाहीर केले. माकपने या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त करत, जनजागृतीसाठी असे उपक्रम वारंवार ठेवावेत असे सुचवल्याचे झैदी यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात पालिका निवडणुकीदरम्यान मतदान यंत्रांमध्ये काही समस्या उद्भवल्याची तक्रार केली. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने जी मतदान यंत्रे वापरली ती आयोगाची नव्हती, असे स्पष्टीकरण त्यांना शनिवारी देण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांमध्ये फरक ओळखता यावा अशी पद्धत आयोगाने विकसित करावी, अशी सूचना या वेळी राष्ट्रवादीने केली. मतदान यंत्रांमध्ये घोळ करण्यासाठी आयोगाचे आव्हान स्वीकारण्यासाठी शनिवारचा दिवस निश्चित केला होता. मात्र सात राष्ट्रीय तर ४९ प्रादेशिक पक्षांपैकी केवळ माकप व राष्ट्रवादीने हे आव्हान स्वीकारले होते.