ट्रेकिंग करताना मनाला जितका आनंद, उत्साह, समाधान मिळते. तितकेच ट्रेकिंग धोकादायक सुद्धा आहे. एका ४० वर्षीय महिलेचा ट्रेकिंग करताना रविवारी दुर्देवी मृत्यू झाला. या महिलेसोबत तिचा पती सुद्धा होता. आठ जणांचा हा ग्रुप ट्रेकिंगसाठी जंगलात गेला होता.

नेमकं काय घडलं?
पी. भुवनेश्वरी असे मृत महिलेचे नाव असून, ती गणपती माँ नगरमध्ये रहायला होती. सनकारा नेत्र रुग्णालयात ती प्रशासकीय अधिकारी पदावर कार्यरत होती. या महिलेचा पती प्रसाथ पेशाने बिझनेसमन आहे. आठ जणांच्या ग्रुपसह हे दोघे पती-पत्नी रविवारी तामिळनाडूतील पालामालाईच्या जंगलात गेले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे नेहमीच वीकएण्डला आपल्या मित्र परिवारासोबत ट्रेकिंगला जायचे. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास भुवनेश्वरी आणि प्रसाथ विजयाकुमार, अरुणन, रमेशकुमार, साक्थी, काथिरवन आणि मोहम्मद अकमल या मित्रांसमवेत पालामालाईच्या जंगलात पोहोचले. रस्त्याच्याकडेला गाडया पार्ककरुन पायी चार किलोमीटर चालत ते पालामालाई जंगलातील एका मंदिराजवळ पोहोचले.

अन्य सात जणांच काय झालं?
तिथून ते कुंजुरपाथी-मानकुझी मार्गाने जात असताना अचानक हत्ती त्यांच्या समोर आला असे पोलिसांनी सांगितले. हत्ती त्यांच्या दिशेने चाल करुन येताच, हा ग्रुप मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळत सुटला. भुवनेश्वरी यांनी झुडुपाच्या आड लपण्याचा प्रयत्न केला. पण हत्तीने त्यांना पायदळी तुडवले. यामध्ये भुवनेश्वरी यांचा मृत्यू झाला.

सुदैवाने ग्रुपमधील अन्य सात ट्रेकर्सना कुठलीही इजा पोहोचली नाही. हत्ती तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. भुवनेश्वरी यांचा मृतदेह कोईंमबतोर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना कुठलीही माहिती न देता हा ग्रुप जंगलातील आरक्षित भागामध्ये ट्रेकिंग करत होता असे वन अधिकारी एस.सुरेश यांनी सांगितले.