अफगाणिस्तानात २०१५ या वर्षांत २००९ पासून सर्वात जास्त नागरिकांचा मृत्यू झाला असून, जखमींचे प्रमाणही जास्तच आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानातील संघर्षांत मुलांनाही मोठा फटका बसला आहे.
अफगाणिस्तानात मृत्यू व जखमींची संख्या २०१४च्या तुलनेत चार पटींनी वाढली आहे. एकूण ११००२ लोकांना संघर्षांचा फटका बसला, त्यात ३५४५ मृतांचा समावेश आहे, तर बाकीचे लोक जखमी आहेत. अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधी निकोलस हेसम यांनी सांगितले, की नागरिकांची झालेली हानी भयानक आहे. नागरिकांच्या हत्या थांबल्या पाहिजेत. जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हल्ले व चकमकीत २०१५ मध्ये जास्त लोक मरण पावले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी २००९ पासून मृत्यू किंवा जखमींच्या संख्येची मोजदाद ठेवली आहे. तालिबानने संयुक्त राष्ट्रांच्या मदत संघटनांच्या लोकांवरही हल्ले केले. २०१५ मध्ये देशविरोधी कारवायात ६२ टक्के घटनात नागरी मृत्यू व तसेच लोकांना जखमी केल्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे. २०१५ मध्ये दहशतवादी गटांच्या हल्ल्यात १७ टक्के लोक जखमी झाले किंवा मरण पावले. २१ टक्के लोक कुणाच्या हल्ल्यात मेले किंवा जखमी झाले हे समजलेले नाही. दहशतवादी अग्निबाणांचा वापर का करतात असा संतप्त सवाल वारडक येथील एका खेडय़ातील व्यक्तीने केला आहे. त्या व्यक्तीचा मुलगा हल्ल्यात मारला गेला होता. एकूण ९ जणांचा हल्ल्यात मृत्यू झाला होता. अफगाणिस्तानात अशा हिंसक घटनांचा फटका बसणाऱ्या दर चार जणांमध्ये एका बालकाचा समावेश आहे. या वर्षी दुर्घटनांमध्ये बालके जखमी किंवा मरण पावण्याचे प्रमाण १४ टक्के वाढले आहे.

शामली जिल्हय़ात उत्सवी गोळीबाराला बंदी
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्हय़ात समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करत असताना आठ वर्षांचा एक मुलगा गोळी लागून ठार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारच्या उत्सवी गोळीबारावर (सेलिब्रेटरी फायरिंग) बंदी घातली आहे.