नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या कामगार नेत्या सुधा भारद्वाज यांना अटक करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक शुक्रवारी मध्यरात्री भारद्वाज यांच्या निवास्थानी पोहोचले. महिला असल्याने नियमानुसार त्यांना रात्री अटक करता येणार नाही. त्यांना शनिवारी सकाळी अटक होण्याची शक्यता आहे.

भारद्वाज यांच्या वकील शालिनी गेरा यांनी पुणे पोलीस हरयाणात पोहोचल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. पुणे पोलिसांचे साध्या गणवेशातील एक पथक रात्री साडे बाराच्या सुमारास भारद्वाज यांच्या निवासस्थानी पोहोचले. हरयाणा पोलीसही तिथे उपस्थित असून सध्या महाराष्ट्र पोलीस अटकेच्या प्रक्रियेची पूर्तता करत आहेत, असे त्यांनी सांगितले. हरयाणातील फरिदाबाद येथे त्यांचे निवासस्थान आहे.

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेले वेरनोन गोन्साल्विस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरूण परेरा यांचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांनी शुक्रवारी दुपारी फेटाळून लावला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. मात्र, जामीन फेटाळल्यानंतर लगोलग पुणे पोलिसांच्या पथकाने गोन्साल्विस आणि परेरा यांना अटक केली. तर दुसरीकडे पुणे पोलिसांचे एक पथक सुधा भारद्वाज यांच्या अटकेसाठी फरिदाबादला पोहोचले. इरॉस गार्डन कॉलनी येथे त्यांचे निवासस्थान आहे.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाडयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणात यापूर्वी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांना अटक केली होती.

कोण आहेत सुधा भारद्वाज
सुधा भारद्वाज या आयआयटी कानपूरच्या १९७८ च्या बॅचच्या टॉपर आहेत. तर २०००मध्ये त्यांनी रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्ला विद्यापिठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. दिवंगत कामगार नेते  शंकर गुहा नियोगी यांच्या कार्याने प्रभावित होऊन सुधा भारद्वाज या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या. ३० वर्षांपासून सुधा भारद्वाज ट्रेड युनियनच्या नेत्या म्हणून काम करत आहेत. मानवाधिकार चळवळीतल्याही त्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. छत्तीसगड पीपल्स यूनियन फॉर सिव्हिल लिबर्टिजच्या त्या सरचिटणीस असून, ‘जनहित’ संघटनेच्या संस्थापक आहेत. सुधा भारद्वाज यांची आई कृष्णा भारद्वाज या जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या डीन होत्या. सुधा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले आहे.