जगातील सर्वात मोठी तरुण स्वयंसेवकांची संघटना असलेल्या राष्ट्रीय कॅडेट कोअर (एनसीसी) या संघटनेच्या कॅडेट्सकडून त्यांची वैयक्तिक माहिती मिळवण्यात येत आहे. सरकारकडून हे काम सुरु असून यामध्ये १३ लाख कॅडेट्सचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल मागवण्यात आले असून ही संपूर्ण माहिती पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे. या माहितीद्वारे पंतप्रधान या कॅडेट्सशी संवाद साधणार आहेत.
सध्या ९ लाख कॅडेट्सकडून अशा स्वरुपाची माहिती एनसीसीने गोळा केली असून ही संपूर्ण प्रक्रिया याच पंधरवड्यात पूर्ण करायची आहे. मात्र, पंतप्रधानांसोबत या विद्यार्थ्यांशी संवादाची तारीख अद्याप निश्चित करण्यता आलेली नाही. पंतप्रधानांच्या वेळे आणि सोयीनुसार ही तारिख निश्चित होणार आहे.

यासंदर्भात २३ फेब्रुवारी २०१८ रोजी लेफ्टनंट जनरल बी. एस. सहरावत (एनसीसी) यांनी सर्व राज्यातील विभागीय कार्यालयांना अधिकृत पत्र पाठवून सूचना देण्यात आल्या आहेत. या माहितीमध्ये कॅडेट्सचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल यांसारखी माहिती मागवण्यात आली आहे. त्याचबरोबर जर एखाद्या कॅडेटकडे मोबाईल क्रमांक नसेल तर त्याच्या पालकांचा क्रमांक देणे बंधनकारक असणार आहे. यामध्ये तो मोबाईल क्रमांक कोणाचा आहे याचा उल्लेखही करावा लागणार आहे. तसेच जर ई-मेल आयडी उपलब्ध नसेल तर एनसीसी कर्मचाऱ्यांच्या मदतीने तो तयार करण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे.

पंतप्रधानांना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायचा असून त्यासाठी ही माहिती गोळा करण्यात येत आहे. त्याचबरोबर या कॅडेट्सच्या मोबाईलमध्ये सर्वांना नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांना कॅडेट्सशी संवाद साधण्याची योजना त्यावेळी बनवण्यात आली जेव्हा डीजी एनसीसी हे गणराज्य दिनी पंतप्रधानांना भेटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः एनसीसी कॅडेट आहेत.