इजिप्तमधील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी लष्कराने दिलेली ४८ तासांची मुदत अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांनी धुडकावली असून एक पाऊल मागे जाण्यास स्पष्ट नकार देतानाच त्यांनी राष्ट्रीय ऐक्याच्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. इजिप्तमधील राजकीय तिढा दिवसेंदिवस गुंतत चालला असून मोर्सी यांना एकाकी पाडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले असल्याचे संकेत मिळत आहेत. परराष्ट्रमंत्री मोहम्मद कमेल अमर यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सोमवारी चार मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता इजिप्त आपल्या उद्देशापासून तसूभरही मागे हटणार नाही. अध्यक्ष मोर्सी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी लक्षावधी नागरिक रस्त्यावर उतरले. जनतेच्या मागण्यांची पूर्तता करण्यास लष्कराने मोर्सी यांना ४८ तासांची मुदत दिली असून त्यानंतर हस्तक्षेप करण्याचा इशारा दिला आहे.
इजिप्तमध्ये होसनी मुबारक यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर गेल्या वर्षी मोर्सी यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. लष्कराने दिलेल्या मुदतीत जनतेच्या मागण्या मान्य न झाल्यास त्यानंतर आम्ही पुढील कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करू, असा इशारा लष्कराने दिला आहे.
तथापि, लष्कराच्या घोषणेला अध्यक्षांकडून हिरवा कंदिल मिळालेला नाही. सामाजिक शांततेला धोका निर्माण होईल आणि दुफळी अधिक वाढेल, अशा कोणत्याही कृत्यांना आम्ही थारा देणार नाही, असेही अध्यक्षांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी मोर्सी संबंधितांशी सल्लामसलत करीत आहेत. मात्र इजिप्तमधील पेचप्रसंगावर त्वरेने तोडगा हवा असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.