News Flash

एम्ब्रेयर २०५ दशलक्ष डॉलर्सला दंड भरणार

भारताने खरेदी केलेल्या तीन विमानांसाठी एम्ब्रेयर विमाने कंपनीने भारतातील दलालास ५.७५ दशलक्ष लाच दिली.

| October 26, 2016 02:11 am

भारतासह चार देशांत दलालांना लाच दिल्याच्या गुन्ह्यातून मुक्तीसाठी ‘तडजोड’

तीन विमानांच्या खरेदीसाठी भारतातील दलालास ५.७६ दशलक्ष डॉलर्सची लाच देण्याबरोबरच इतर तीन देशांत कंत्राटे मिळविण्यासाठी केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांतून मुक्त होण्यासाठी ब्राझीलच्या एम्ब्रेयर या विमान कंपनीने २०५ दशलक्ष डॉलर्स दंड भरण्याची तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचा न्याय विभाग आणि ब्राझील प्रशासनासोबतच्या यासंदर्भातील कराराची रोखे व विनिमय आयोगाने मंगळवारी घोषणा केली.

भारताने खरेदी केलेल्या तीन विमानांसाठी एम्ब्रेयर विमाने कंपनीने भारतातील दलालास ५.७५ दशलक्ष लाच दिली. हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी रडार यंत्रणा सज्ज असलेल्या या विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने गुन्हा नोंदवला. डॉमनिक रिपब्लिककडून विमान कंत्राट मिळविण्यासाठी एम्ब्रेयरने तेथील अधिकाऱ्यांना ३.५२ दशलक्ष डॉलर्सची दलाली दिली. तसेच सौदी अरेबियाकडून कंत्राट मिळविण्यासाठी १.६५ दशलक्ष डॉलर्स आणि मोझांबिक देशाकडूनच्या कंत्राटासाठी एम्ब्रेयरने आठ लाख डॉलर्स दलाली मोजल्याचा आरोप आहे. या देशांत दलालांना लाच देऊन एम्ब्रेयर कंपनीने ८३ दशलक्ष डॉलर्सचा नफा कमावल्याचे रोखे व विनिमय आयोगाच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

रोखे व विनिमय आयोग व ब्राझीलच्या अधिकाऱ्यांशी करण्यात आलेल्या तडजोडीनुसार ९८ दशलक्ष डॉलर्सचा दंड कंपनी भरणार आहे. तसेच आणखी १०७ दशलक्ष डॉलर्स दंड भरण्याची तयारी कंपनीने दर्शवली आहे.

चौकशी सुरूच राहणारपर्रिकर

भ्रष्टाचार प्रकरण मिटविण्यासाठी एम्ब्रेयर कंपनीने दंड भरण्याची तयारी दर्शवली असली तरी ही कंपनी भारतीय कायद्यातून सुटू शकणार नाही. या कंपनीविरोधात सीबीआय चौकशी सुरूच राहील, असे संरक्षमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले. तीन विमानांच्या खरेदी प्रकरणात पुराव्यांच्या आधारे चौकशी करून दोषींना शिक्षा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. संरक्षण पुरवठादारांच्या काळय़ा यादीबाबत नवे धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे पर्रिकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 2:11 am

Web Title: embraer aircraft company will pay fine
Next Stories
1 कावेरी प्रश्नावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा
2 डोनाल्ड ट्रम्प लोकशाही परंपरेत बसणारे नाहीत- क्लिंटन
3 चीनमध्ये शक्तिशाली स्फोटात १४ ठार
Just Now!
X