रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपाकडून १९७५च्या आणीबाणी केली जात आहे. त्यातच आता भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी चक्क दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी २.० चा लागल्याचा दावा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं पोस्टर लावलं आहे.

वास्तुविषारद असलेले अन्वय नाईक यांनी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (५ नोव्हेंबर) ताब्यात घेण्यात आलं. रायगड पोलिसांनी केलेल्या या अटकेवरून भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपा नेत्यांनी या घटनेची तुलना आणीबाणीशी केली.

महाराष्ट्र भाजपाकडून राज्य सरकारला लक्ष्य केलं जात असतानाच दिल्लीतील भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत महाराष्ट्रात आणीबाणी २.० लागल्याचा दावा केला. महाराष्ट्र सदनाबाहेर लावण्यात आलेल्या या पोस्टरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे फोटो आहेत. ‘आणीबाणी २.०मध्ये आपलं स्वागत आहे,’ असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

प्रकरण काय?

मूळच्या अलिबागमधील कावीर येथील अन्वय नाईक यांचा मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ नावाचा वास्तुसजावटीचा व्यवसाय होता. ते ४ मे २०१८ रोजी कावीर येथील निवासस्थानी आले होते. दुसऱ्याच दिवशी (५ मे) अन्वय यांच्यासह आई कुमूद यांचा मृतदेह नोकरांना घरात आढळला. पोलिसांना तिथे आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. अर्णब गोस्वामी, ‘आयकास्ट स्काय मीडिया’चे फिरोज शेख, ‘स्मार्टवर्क्‍स’चे नीतेश सारडा या तिघांनी पैसे थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे अन्वय यांनी या चिठ्ठीत नमूद केले होते. त्यांच्या पत्नी अक्षता यांच्या तक्रारीवरून या तिघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासात काहीही निष्पन्न झालेले नसल्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केल्यानंतर तपास बंद करण्यात आला. मात्र या प्रकरणाचा तपास पुन्हा करण्याची विनंती अन्वय यांची पत्नी आणि मुलीने राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या फेरतपासाचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते.