करोना विषाणूची लागण ही ‘आणीबाणी’ असल्याचे हाँगकाँगने शनिवारी जाहीर केले. या रोगाची आणखी लागण होण्याचा धोका कमी करण्याच्या उपाययोजनांना अधिकाऱ्यांनी गती दिली आहे.

या संकटाचा सामना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका झाल्यानंतर, शहराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लाम यांनी ही घोषणा केली.

हाँगकाँगमध्ये आतापर्यंत ज्या पाच जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, त्यापैकी चार जण मुख्य भूमीला जोडणाऱ्या नवनिर्मित हायस्पीड ट्रेन टर्मिनलमार्गे आले होते. त्यामुळे, या विषाणूच्या फैलावाचे केंद्र असलेल्या चीनमधून लोकांचे आगमन थांबवावे, किंवा त्यावर मर्यादा आणावी, असे आवाहन काही वैद्यकीय तज्ज्ञ आणि राजकीय नेत्यांनी केले होते.

दावोसवरून परतल्यानंतर कॅरी लाम यांनी करोना विषाणूच्या प्रसाराबाबत आरोग्य अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आणि आणीबाणी लागू केल्याची घोषणा केली.

चीनमध्ये विषाणूबाधेचे ४१ बळी

बीजिंग : चीनमध्ये करोना विषाणूचा प्रसार चालूच असून आतापर्यंत ४१ जण मरण पावले आहेत. एकूण १२८७ जणांना विषाणूची लागण झाली असून त्यात २३७ लोकांची प्रकृती गंभीर आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एकूण हजाराहून अधिक लोकांना विषाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून तेथील अनेक शहरे या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

या विषाणूची बाधा होऊन ४१ जण न्यूमोनियाने मरण पावले आहेत, त्यात चीनच्या हुबेई प्रांतातील रुग्णालयात ३९ जणांचा मृत्यू झाला. ईशान्येकडील हेलाँगजियाँग भागात एक जण मरण पावला आहे. आणखी १९६५ जणांना विषाणूची लागण झाली असून हाँगकाँग, मकाव, तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनाम, अमेरिका या देशात हा विषाणू पोहोचला आहे. जपानमध्ये दोन रुग्ण सापडले आहेत. भारतासाठी या विषाणूचा प्रसार ही चिंतेची बाब असून एकूण सातशे भारतीय विद्यार्थी वुहान व हुबेई प्रांतातील विद्यापीठात आहेत.

१०० जण देखरेखीखाली

नवी दिल्ली : करोना विषाणूची लागण झाल्याचा संशय असलेल्यांची तपासणी झाल्यानंतर केरळ व महाराष्ट्रात १०० हून अधिक लोकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.  या संदर्भात उपाययोजनांचा पंतप्रधान कार्यालयाने शनिवारी आढावा घेतला.

सात प्रवाशांचे नमुने पुणे येथील आयसीएमआर- एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असले, तरी देशात आतापर्यंत कुणालाही या विषाणूची बाधा झाल्याचे आढळले नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.