विमानाच्या टायरजवळून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्यावर सोमवारी सकाळी एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. विमानात १२० प्रवासी होते. त्यासर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, या घटनेनंतर काही वेळ विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.
हैदराबादहून मुंबईला आलेल्या विमानाच्या टायरजवळून धूर येत असल्याचे वैमानिकाच्या निदर्शनास आल्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास इमर्जन्सी लॅंडिंग करण्यात आले. यावेळी विमानतळावर अग्निशामक दलाचे बंब तैनात ठेवण्यात आले होते. विमान धावपट्टीवर उतरल्यावर विमानातील सर्व प्रवाशांना तातडीने बाहेर काढून सुरक्षितस्थळी नेण्यात आले. विमानाचा टायर फुटल्यामुळे तेथून धूर येत असल्याची माहिती मिळाली आहे. विमानाचा टायर कशामुळे फुटला, याची शोध घेण्यात येतो आहे.
दरम्यान, विमानतळावरील मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आल्यामुळे त्या काळात पर्यायी धावपट्टीवरून उड्डाणे सुरू ठेवण्यात आली होती.