देशात आणीबाणी लागू करण्यात आली तो सर्वात वाईट कालखंड होता. काँग्रेसने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली, असा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी चढविला. सत्तेच्या लालसेपोटी ४० वर्षांपूर्वी देशाला बेडय़ांमध्ये जखडण्यात आल्याने देशाचे रूपांतर कारागृहात झाले होते, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
देशात आणीबाणी लागू करण्यात आली त्याला ४० वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून मोदी यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारवर सडकून टीका केली. मुक्त लोकशाही ही प्रगतीची किल्ली असते, त्यामुळे लोकशाहीच्या मूल्यांना बळकटी देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील, असेही पंतप्रधान म्हणाले.
देशात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लादण्यात आली आणि ती २१ मार्च १९७७ पर्यंत लागू होती. या कालावधीत नागरी स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली आणि इंदिरा गांधी यांच्या कृतीला विरोध करणाऱ्या प्रमुख राजकीय नेत्यांना अटक करण्यात आली, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे. आणीबाणीला ज्या लक्षावधी लोकांनी विरोध केला त्यांचा आपल्याला अभिमान वाटतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आजमितीला लोकशाही रचना अबाधित आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनानुसार असंख्य लोकांनी लोकशाही वाचविण्यासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले, असेही पंतप्रधान म्हणाले.
‘देशात सध्या अघोषित आणीबाणी’
केंद्र सरकारने सध्या देशात अघोषित आणीबाणी लागू केली असल्याचा प्रतिहल्ला काँग्रेसने गुरुवारी चढविला. देशात ४० वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेली आणीबाणी हा सर्वात वाईट कालखंड होता, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. सुटा-बुटातील सरकारने देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू केली आहे, असे काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा म्हणाल्या आणि त्यांनी त्याच्या पुष्टय़र्थ भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही अशाच प्रकारचे मत व्यक्त केले असल्याचे स्मरण करून दिले. लालकृष्ण अडवाणी यांच्यापाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनीही सरकारवर टीका केली असल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनाही देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू असल्यासारखे वाटत आहे, असे ओझा म्हणाल्या.