ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि केंद्र सरकारचे माजी सल्लागार किरीट जोशी यांचे कर्करोगाच्या आजाराने रविवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होते.
जोशी यांनी मुबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले होते. १९५५मध्ये ते भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल झाले. मात्र योगी अरविंद यांच्या समग्र योगविद्येचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वर्षभरात प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेतली.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जोशी यांची १९७६ मध्ये केंद्र सरकारचे शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. ‘भारतीय तत्त्वज्ञान संशोधन आयोगा’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. १९८७-८९मध्ये त्यांनी युनेस्कोच्या हॅमबर्ग येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद सांभाळले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरीट जोशी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘‘देशाने एका हुशार व्यक्तीला आणि शिक्षणतज्ज्ञाला गमावले आहे. योगी अरविंद यांच्या विचारांचा प्रसार केल्याबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील,’’ असे मोदी म्हणाले.