युरोप समर्थक ‘एन मार्च’ पक्षाचे मध्यममार्गी उमेदवार इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. मॅक्रॉन यांनी त्यांचा विजय हा फ्रान्सच्या ‘उमेद आणि विश्वासाने भरलेल्या अध्यायाची सुरुवात’ असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे ३९ वर्षीय मॅक्रॉन फ्रान्सचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मेरी ल पेन यांचा पराभव केला.

प्राथमिक अंदाजानुसार इमॅन्युएल मॅक्रॉन यांना ६५.५ ते ६६.१ टक्क्यांदरम्यान मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी मेरी ल पेन यांना ३३.९ ते ३४.५ टक्क्यांदरम्यान मते मिळाली. ‘आज रात्रीपासून एका मोठ्या अध्यायाची सुरुवात होत आहे. हा नवा अध्याय आशा आणि उमेदीने भरलेला असेल,’ असे इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले. नॅशनल फ्रंट पक्षाच्या नेत्या मेरी ल पेन यांनी पराभव स्वीकारत मॅक्रॉन यांचा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हणत त्यांचे अभिनंदन केले.

आपण मॅक्रॉन यांचे अभिनंदन करण्यासाठी दूरध्वनीवरुन संवाद साधल्याने मेरी ल पेन यांनी सांगितले. इमॅन्युएल मॅक्रॉन यांना त्यांच्यासमोरील कडव्या आव्हानांना सामोरे जाण्यात यश मिळेल, अशी आशा मेरी ल पेन यांनी व्यक्त केली. तीन वर्षांपूर्वी राजकारणातील फारसा परिचित चेहरा नसलेले इमॅन्युएल मॅक्रॉन युरोपातील एक सामर्थ्यवान नेते म्हणून उदयास आले आहेत. फ्रान्स आणि युरोपसमोरील राजकीय आणि आर्थिक आव्हानांचा सामना आता इमॅन्युएल मॅक्रॉन यांना करावा लागणार आहे.