वैज्ञानिकांनी भावना असलेला यंत्रमानव तयार केल्याचा दावा केला असून मानव व अँड्रॉइड यंत्रमानव यांच्यातील दीर्घकालीन नातेसंबंध अभ्यासण्यासाठी त्यांनी एरविन ( इमोशनल रोबोट विथ इंटेलिजंट नेटवर्क) या यंत्रमानवाची निर्मिती केली आहे. ब्रिटनमधील लिंकन विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाचे डॉ. जॉन मरे यांनी भावना असलेल्या यंत्रमानवाची संकल्पना प्रथम मांडली होती. मानवसदृश यंत्रमानवातील वैचारिक भेद हे मानव-यंत्रमानव यांच्यातील नातेसंबंधांवर काय परिणाम करतात याचा अभ्यास करण्यासाठी या यंत्रमानवाचा वापर केला जाणार आहे. मानव व सहकारी यंत्रमानव यांच्यातील नाते अधिक दृढ करण्यासाठी त्याचा वापर होणार आहे. बोधनातील भेदामुळे माणूस व यंत्रमानव वेगळे असतात त्याचे स्वभाव, व्यक्तिमत्त्व वेगळे असतात. त्यांच्यात काही अपूर्णता असते. त्यामुळे बोधन भेद यंत्रमानवात आणले  तर यंत्रमानव हा माणसाप्रमाणे बोधन पातळीवर अपरिपूर्ण होईल व त्यामुळेच तो माणसासारखा होईल असा दावा पीएच.डी.चे विद्यार्थी मृगांक विश्वास यांनी केला आहे.